उस्मानाबादच्या पोलीस खात्याला लाचखोरीची कीड !

तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या काळात पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली होती. अनेक पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले होते.  ते गेल्यानंतर  पोलीस खात्याला लागलेली लाचखोरीची कीड नष्ट  होईल असे वाटले होते पण नूतन पोलीस अधीक्षक आर,. राजा यांच्या काळातही ही कीड वाढतच आहे.

अपघाताचा पंचनामा देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या बेंबळी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार यास मागील आठवड्यात पकडण्यात आले होते. त्याची शाई वाळते न वळते ढोकी पोलीस स्टेशनमधील दोन लाचखोर सहायक  पोलीस निरीक्षक  गणपत धनसिंग जाधव आणि जोतीराम गणपत कवठे यांना आज पकडण्यात आले. ४० हजार लाचेची मागणी करून २० हजार स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

परवा नळदुर्ग पोलिसांनी वाळूने भरलेला टिप्पर पकडला होता. पोलीस स्टेशनमध्ये लावलेला टिप्पर चालक रातोरात पळवून नेतोच  कसा ? हे एक न उलगडणारे कोडे आहे. प्रकरण अंगलट येताच पोलिसांनी चालक आणि मालक यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाली असून त्याची  सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

नूतन पोलीस अधीक्षक आर. राजा हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात, पण यंत्रणाच इतकी भ्रष्ट झाली आहे की, त्यांचीही दिशाभूल सुरु आहे. पोलीस अधीक्षकांनी सथापन केलेल्या दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस कर्मचारी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मागील काळात निलंबित झालेले आणि लाचखोर म्हणून ज्यांची प्रतिमा आहे अश्याची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हा अन्व्हेंशन विभाग ( एलसीबी ) आणि   दरोडा प्रतिबंधक  पथक मिळत नाही म्हणून वर्षभर रजेवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. यातील अनेक पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षं एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. त्यांची बंगले पाहिले की  कोटीच्या घरात आहेत.  दरोडा प्रतिबंधक पथक मागील काळात बंद करण्यात आले होते. आता पुन्हा स्थापन झाल्याने एलसीबी आणि  दरोडा प्रतिबंधक पथक  यांच्यात चढाओढ लागली आहे.

पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी, आल्या आल्या काही मटकाकिंगच्या मुसक्या आवळल्या होत्या, पण त्यांच्या पंटरनी पुन्हा मटका बुक्की सुरु केली आहे. हे मटकाकिंग कोण आहेत, त्यांचे अड्डे कुठे आहेत हे माहित असताना त्याना नेमकं कोण पाठीशी घालतंय ?

पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडून   जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यावर अंकुश लावला तरच पोलीस यंत्रणा सरळ होणार आहे. अन्यथा देशमुख गेले आणि राजा आले तरी फरक नाही पडला ! अशी म्हणण्याची पाळी येऊ नये !

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह 
www.osmanabadlive.com


Post a Comment

0 Comments