उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन नाही…

   निराश रवी सेना उमरग्यात परत

उमरगा – विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर संतप्त झालेली रवी सेना मुंबईत धडकली होती. दस्तुरखुद्द गायकवाड सरही मुंबईत दाखल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेआणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत नेमके काय आश्वासन मिळाले हे समोर आले नाही. कामाला लागा, भविष्यात विचार केला जाईल, इतकेच सांगण्यात आले. त्यामुळे रवी सेना निराश होवून   उमरग्यात परतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि रवी सेनेचे प्रमुख बसवराज वरनाळे बंडखोरी करून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाख मतांनी विजयी होणाऱ्या रवी गायकवाड यांचा यंदा पत्ता कट झाला. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे रवींद्र गायकवाड नाराज झाले. त्यांची सेना  आक्रमक झाली.  उमरग्यात मेळावा झाला. पैसे घेऊन उमेदवारी आणल्याचा आरोप झाला. सावंत आणि ओमराजेंवर शिव्यांची बरसात करण्यात आली. नंतर रवी सेना गनिमी कावा करत मुंबईत धडकली. दस्तुरखुद्द गायकवाड सर यांना मातोश्रीवरून बोलावणे आले.  रवी सर, शिलेदार आ. ज्ञानराज चौगुले आणि माजी आमदार  ज्ञानेश्वर पाटील मातोश्रीवर गेले. तह झाला आणि पदरात निराशा पडली. बाहेर पडताच सर काही बोलेनात. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. नंतर ते आणि त्यांचे शिलेदार मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यांवर गेले. तेथे देवेंद्रजी फक्त  गोड  गोड  बोलले.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली हे सांगायला सर तयार नाहीत. त्यामुळे रवी सेना बुचकळ्यात पडली आहे.काही रवी सैनिक ओमराजेंना धडा शिकवण्यासाठी माजी उपजिल्हा प्रमुख आणि रवी सेनेचे प्रमुख बसवराज वरनाळे यांना पुढे केले आहे. त्यांना रवींद्र गायकवाड यांनी आशीर्वाद दिला आहे.

Post a Comment

0 Comments