उस्मानाबाद लोकसभा : सामना चुरशीचा आणि प्रतिष्ठेचा !

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेने आपल्या भात्यातून ओमराजेचा  बाण काढताच राष्ट्रवादीच्या  घडाळ्याची काटे जलद गतीने फिरली आणि ओमराजेंना टक्कर देण्यासाठी आमदार राणा पाटील हे दुधारी शस्त्र बाहेर काढले. ओमराजे आणि राणा पाटील हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे सामना  अत्यंत चुरशीचा आणि प्रतिष्ठेचा होणार आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, परांडा या चार विधानसभा मतदार संघाचा तसेच सोलापूर जिल्हयातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचा समावेश आहे.उस्मानाबाद, परांडा, बार्शी  विधानसभेचे आमदार राष्ट्रवादीचे, तुळजापूर आणि औसा मतदार संघाचे आमदार काँग्रेसचे तर उमरगा मतदार संघाचे आमदार शिवसेनेचे आहेत.

शिवसेनेने विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट करून माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तथा ओमराजेंना उमेदवारी जाहीर केली आहे. नॉट रिचेबल खासदार म्हणून गायकवाडांची प्रतिमा झाली होती. जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये असे साकडे घालून ओमराजेंच्या उमेदवारीची मागणी केली होती. जिल्ह्यातील उमरग्याचे आमदार चौगुले, परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील वगळता अन्य शिवसेना पदाधिकारी ओमराजेंच्या पाठीशी होते. जनतेची नाराजी, पदाधिकाऱ्यांची नाराजी तसेच संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांचा विरोध यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोंडीत सापडले होते. त्यात राष्ट्रवादीकडून आमदार राणा पाटील यांचे नाव फिक्स झाल्यानंतर ओमराजेंना उमेदवारी देणे भाग पडले. शिवसेनेने सर्व विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र गायकवाड गेल्या निवडणुकीत अडीच लाखांनी विजयी होऊनही त्यांचे तिकीट कापले गेले, हे विशेष !

राणा का तयार  झाले ?
लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून आमदार राणा पाटील हे सुरुवातीला तयार नव्हते. पाटील घराण्यातून त्यांच्या पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांचे नाव पुढे आले होते. शिवाय बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या नावाची चर्चा होती. राणा पाटील अर्चना ताईसाठी  आग्रही होते तर शरद पवार अर्चना ताईना उमेदवारी देण्यास तयार नव्हते. एक तर स्वतः लढा नाही तर आम्ही देऊ तो उमेदवार निवडून आणा असा आदेश पवारांनी देताच शेवटी राणा पाटील नाइलाजास्तव तयार झाले.

गायकवाडांची भूमिका निर्णायक
शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड सुरुवातीपासून शिवसेनेत आहेत, उमरगा आणि लोहारा तालुक्यात त्यांचे प्राबल्य आहे. ते या मतदार संघाचे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. त्यांना तिकीट कापल्यामुळे ते कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष आहे. तसेच परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि ओमराजें यांच्यात आडवा विस्तव जात नाही. रवींद्र गायकवाड आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्या भूमिकेवर ओमराजेंचे भवितव्य अवलंबून आहे.

भाजप आघाडी धर्म  पाळणार ?
उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची आघाडी आहे. लोकसभा निवडणुकीत उस्मानाबादची जागा भाजपने मागितली होती. भाजपची जिल्हयात म्हणावी तितकी ताकद नाही. मात्र भाजप आघाडी धर्म पाळणार की जिल्हा परिषद आणि जि. म. बँकेप्रमाणे राष्ट्रवादीच्या मांडीमागे मांडी लावणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.

काँग्रेस हातात घड्याळ बांधणार ? की …
राष्ट्रवादीने आजपर्यंत काँग्रेसला सापत्नपणाची वागणूक दिली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीने काँग्रेस बरोबर आघाडी न करता भाजपशी हातमिळवणी केली होती.  त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर चिडून आहेत. काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांचे ओम राजे विषयी असलेले प्रेम सर्वश्रुत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते हातात घड्याळ बांधणार की धनुष्यबाण घेणार यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

निवडणूक चुरशीची
दोन्ही पक्षाचे उमेदवार तुल्यबळ आहेत. दोन्ही पक्षात कमीअधिक  नाराजी आहे. दोन्ही पक्षाचे मित्र पक्ष असून अडचण नसून खोळंबा आहेत . मागच्या विधानसभा निवडणुकीत  ओमराजे दहा हजार मतांनी पराभूत झाले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ओमराजे सज्ज आहेत तर पुन्हा एकदा पराजित करण्यासाठी राणा पाटील सरसावले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात निवडणूक अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची होणार आहे. त्यात कोण बाजी मारणार हे सांगणे सध्या तरी अवघड आहे.

सुनील ढेपे
संपादक , उस्मानाबाद लाइव्ह

Post a Comment

0 Comments