शिवसेनेतील बंडाळी आणि सावंत पर्व !

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे  उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी, एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मजबूत मोट बांधली असताना, दुसरीकडे शिवसेनेत बंडाळी माजली आहे.

विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज नव्हे तर संतप्त झाले आहेत. शनिवारी उमरग्यात रवी सेनेचा मेळावा पार पडला, त्यात संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर शिव्यांची बरसात करण्यात आली, पैसे देवून उमेदवारी आणल्याचा थेट आरोप  संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आला, रवी सरांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडून लढण्याची साद घालण्यात आली. रवी सर मेळाव्याला उपस्थित नव्हते, पण त्यांनी अप्रत्यक्ष खतपाणी घातले, हे कळते.
शनिवारच्या मेळाव्यानंतर रवी सेनेने याच  रात्री दोन ट्रॅव्हल्स आणि असंख्य गाड्या घेवून मुंबईकडे कूच केली आहे. रविवारी मातोश्री किंवा सेना भवन मध्ये जावून ही रवी सेना रवींद्र गायकवाड यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी करणार आहे. मागणी मान्य न झाल्यास सर्व रवी सेना शिवसेना सोडणार आहे.
ओमराजेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत एकीकडे बंडाळी माजली असताना , राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मजबूत मोट बांधली आहे. शनिवारी तिकडे उमरग्यात रवी सेना बंडाचे निशाण फडकावत असताना, दुसरीकडे तुळजापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संयुक्त मेळावा पार पडला, या मेळाव्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते. आम्ही एक आहोत, हा संदेश यातून देण्यात आला.
गेली पाच वर्षे राष्ट्रवादी आणि  काँग्रेस देशात आणि राज्यात सत्तेच्या बाहेर आहे, मात्र जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर दोन्ही पक्षांनी सत्ता कायम ठेवली आहे. एकीकडे या दोन्ही पक्षात एकी पहावयास मिळत असताना दुसरीकडे शिवसेना दुभंगताना दिसत आहे. ते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पथ्यावर पडत आहे.

उद्योगपती तानाजी सावंत शिवसेनेत आल्यापासून तानाजी पर्व सुरू झाले आहे. सावंत यांच्यामुळे माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील बाहेर पडले, आता भाजपात आहेत.परंडयाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सावंत यांच्यामुळे अडगळीत पडले आहेत, ते सावंतावर खार खावून आहेत.आता दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार झालेले रवींद्र गायकवाड नाराज झाले आहेत.

सेनेत जुना निष्ठावंत गट आणि नवा गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत.लिमिटेड असलेली  भाजप शांत आहे. त्यामुळे सेनेचे ओमराजें यांना निवडणूक जड झाली आहे. सेनेतील बंडाळी न थांवल्यास ओमराजेंचे  भवितव्य अवघड आहे.

- सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्हPost a Comment

0 Comments