रवी सेनेच्या गाड्या पोलिसांनी तुळजापुरात अडवल्या !

तुळजापूर - खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर संतप्त रवी सेना शनिवारी रात्री मुंबईकडे निघाली होती. मात्र त्यांच्या गाड्या तुळजापुरात अडवून नोटीस बजावण्यात आली . कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी या गाड्या अडवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले,

रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार  घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखलं. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पिटाळण्यात आलं. या नोटिसीत सकाळी आठच्या आधी गाव सोडू नये, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. त्यामुळे आज मुंबईत काय घडामोडी घडणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत अडीच लाख मतांनी विजयी झालेल्या झालेल्या उमरग्याच्या खासदार रवींद्र गायकवाड यांचा यंदा पत्ता कट झाला असून माजी आमदार ओम राजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. काल गायकवाड समर्थकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी उमरग्यात मेळावा घेतला. यावेळी गायकवाड यांच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा भोसले नावाच्या समर्थकानं ‘तिकिट पाहिजेच’ असा घोष करत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी या समर्थकास तातडीनं रोखलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी मेळाव्याच्या ठिकाणी जमलेल्या काही इतर कार्यकर्त्यांकडूनही चार ते पाच रॉकेलच्या बाटल्या जप्त केल्या.

दोन ट्रॅव्हल्स आणि असंख्य गाड्या घेऊन रवी सेना मुंबईकडे जात असताना दोन ट्रॅव्हल्स तुळजापुरात शनिवारी रात्री १ वाजता तुळजापूरजवळ अडवण्यात आल्या. एक लोहारा आणि एक  उमरगा येथील एक ट्रॅव्हल्स होती. त्यांना नोटीस बजावून  मागे पिटाळण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वरून आदेश आल्यामळे या गाड्या अडवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.
Post a Comment

0 Comments