उस्मानाबादसाठी राणा दादा फायनल !

उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर विद्यमान  आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेकडून कोणीही उमेदवार राहिला तरी राणा दादा हेच फायनल राहतील, असे राष्ट्रवादीच्या एका सूत्राने सांगितले. उद्या किंवा परवा राणा दादांचे नाव घोषित होईल, असे खात्रीशीर वृत्त आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद मतदार संघासाठी राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे लक्ष वेधले असले तरी, काल मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब  झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.


उस्मानाबाद मतदार संघासाठी सुरुवातीला आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्याला ग्रिन सिग्नल नव्हता. त्यांचा आग्रह फक्त राणा पाटील यांनाच  होता. तसे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने यापूर्वी दिले होते.


लोकसभेची एक - एक जागा महत्वाची असल्याने आणि ही  निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची  बनल्याने शरद पवार यांनी राणा पाटील यांनाच उभे राहण्याचा आदेश दिला. त्यामुळे  राणा पाटील यांनी अखेर होकार दिला आहे. उद्या किंवा परवा त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.


म्हणून चाकूरकरांची भेट

दोन दिवसापूर्वी आमदार राणा पाटील यांनी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांची लातुरात देवघरात भेट घेतली. यामुळे काही माध्यमांनी वेगळा अर्थ काढला. मात्र राणा पाटील हेच उमेदवार असल्याने त्यांनी चाकूरकर यांचा आशिर्वाद घेतला. त्याचबरोबर नळदुर्ग येथील राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली. तसेच राष्ट्रवादी आणि काँगेस कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणले. आमदार राणा पाटील यांनी मतदार संघात संपर्क वाढवला आहे.


    शिवसेनेची उमेदवारी विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना फायनल झाली आहे. मात्र ओम राजेंनी अजूनही आशा सोडली नाही. शिवसेनेचा उमेदवार कोणीही असला तरी राष्ट्रवादीकडून आमदार राणा पाटील हेच फायनल असतील, हे मात्र नक्की.

Post a Comment

0 Comments