उजनीच्या पाणी पुरवठ्यावरून ‘राजकारण’

आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यात ‘कलगीतुरा’ सुरू

उस्मानाबाद – शहराला 15 दिवस झाले तरी नळाला पाणी आलेले नाही. उजनी पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे, त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही उस्मानाबादकरांच्या नशिबी पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे.

एकीकडे उस्मानाबादकर पाण्यासाठी तडफडत असताना पुन्हा एकदा पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी, नगरपालिकेच्या निष्क्रिय,भ्रष्ट, नियोजनशून्य कारभारामुळे उजनीचे पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत, ही योजना डॉ पद्मसिंह पाटील यांच्यामुळे मंजूर झाल्याचे सांगत, पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी एखाद्या तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.

उजनी योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी योग्य तरतूद न केल्यामुळे उजनी धरणात मुबलक पाणी असतानाही शहरवासीयांना 15-20 दिवसांनी पाणी मिळत आहे असा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून केला होता तसेच या प्रश्नी संयुक्त बैठक घेऊन शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

त्यावर पलटवार करताना नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर म्हणाले की, ही योजना मंजुरीसाठी अडकली असती पण आपणच मंत्रालयात खेटे मारून नवीन प्रस्ताव सादर केला, जेव्हा टेंडर मंजूर झाले तेव्हा नगरसेवक उदय निंबाळकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर आमदार राणा पाटील तोंड लपवून बसले होते.तेंव्हा आपणच सर्व बाबींना तोंड दिले.

राणा पाटील यांना सर्व परिस्थिती माहीत आहे, केवळ पत्रकबाजी करून श्रेय मिळवण्याची त्यांची जुनी सवय आहे. जेव्हा या योजनेचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, तेव्हा मी गटनेता असतानाही कार्यक्रमास येऊ दिले नाही. मला श्रेय मिळू नये यासाठी राणा पाटील जाणीवपूर्वक असे वागले.

2013 साली भीषण दुष्काळ असताना उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागाला 30 लाख लिटर पाणी का दिले नाही असा सवाल केला. उजनी पाणी पुरवठा योजनेत अनेक त्रुटी होत्या, त्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिल्या मात्र त्याकडे आमदार राणा यांनी हेतुतः कानाडोळा केला. 26 एमएलडीचा स्वतंत्र आराखडा करणे गरजेचे असताना रुईभर व तेरणा येथील प्रत्येकी 5 एमएलडी पाणीसाठी त्यात मिसळला गेला त्यामुळे 10 एमएलडीचा तोटा आमदार राणा पाटील यांनी न ऐकल्यामुळे झाला. अटल अमृत योजनेच्या अंमलबजावणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व्यतिरिक्त इतर यंत्रणेकडून आराखडा बनवून घेऊ असे सांगितले तरी त्यात आमदार राणा यांनी खोडा घातला असा आरोप केला.
उजनी पाणी पुरवठा योजनेसाठी सध्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली असून पाईपलाईन टेस्टींग, विद्युत यंत्रणा व अद्यावत पंप बसविण्यात आले आहेत शिवाय पाणीगळती होऊ नये यासाठी 130 टेंपर प्रूफ व्हॉल्व्ह बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे . 16 एमएलडी पाईपलाईनची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असली तरी टप्याटप्याने पाणी उपसा वाढविणे उचित ठरणार आहे .

एकाच वेळी पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केल्यास पाईपलाईन फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे 5 एमएलडीचा एक टप्पा करीत उपसा केला जाणार आहे. पाणी साठविण्यासाठी आवश्यक टाक्या असून आगामी काळात हळूहळू पाणी टंचाई कमी होणार आहे, असे आश्वासन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिले.

उजनी पंपहाऊसचे काम प्रगतीपथावर आहे. मंगळवार व बुधवारी लोड शेडींग असल्यामुळे त्यात अथडळे येत आहेत. सध्या दररोज 4 ते 5 एमएलडी पाणी उपसा होत असून, त्यातील 20 लाख लिटर पाणी वॉल गळतीमुळे कमी होत आहे. ही वॉल गळती थांबविण्यासाठी 130 नवीन वॉल बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंपहाऊस येथे पाणी उपसेची यंत्रणा बसविली असून 5 एमएलडी क्षमतेचे तीन पंप तयार आहेत तर दोन पंप आपतकालीन स्थितीत राखीव ठेवले आहेत. 1 मे पासून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होणार असून आठवड्यातुन एक दिवस पाणीपुरवठा होईल. तेरणा व रुईभर धरण भरले तरच उस्मानाबाद शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा शक्य असल्याचे वास्तव त्यांनी सांगितले.राणा पाटील यांची सध्या राजकीय स्टंटबाजी असल्याचेही मकरंद राजेनिंबाळकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments