उमरगा पोलिसांची रझाकारशाही !

उस्मानाबाद जिल्ह्यात पोलिसांची रझाकारशाही पुन्हा एकदा अवतरली. खाबुगिरीची सवय लागलेल्या उमरगा पोलिसांनी दारूच्या नशेत तलमोड गावात अक्षरशः धुडगूस घातला. बुधवारी मध्यरात्री पोलीस दरवाजे तोडून अनेकांच्या घरात घुसले. पोलिसी दंडुक्याने अनेकांना झोडपून काढले. त्यात एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. कनगरा गावात मे २०१४ रोजी जसे घडले होते, अगदी तसेच तलमोड गावात घडले आहे. अंगाची लाही - लाही व्हावी असा प्रकार घडला आहे.

उमरगा तालुक्यातील तलमोड गावात २१ एप्रिल रोजी महादेवाची यात्रा होती. या यात्रेसाठी पुण्याहून काही तरुण गावी आले होते. सायंकाळी कारने पुण्याकडे परत जात असताना कराळी गावाजवळ टायर फुटून कार खड्ड्यात पडली आणि पेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला. पोलीस लवकर आले नाहीत, त्यामुळे तिघांचा होरपळून मृत्यू झाला. वातावरण स्फोटक झाले. काही तरुण संतप्त झाले. उशिरा आलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. पोलीस जीपवरही काही दगड मारले.

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी १५ ते २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दगडफेक करणारे तरुण सराईत गुन्हेगार नव्हते. पोलीस त्यांना केव्हाही अटक करू शकले असते. पण पोलिसांनी बुधवारी रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवले. बुधवारी मध्यरात्री पोलिस उपनिरिक्षक सुभाष माने, हवालदार पी. डी. गवळी यांच्यासह सात ते आठ कर्मचारी तलमोड गावात गेले. ते दारूच्या नशेत होते, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. गावात जावून धरपकड सुरु केली. काहींच्या घरात बळजबरीने घुसले. काही घरांचे दरवाजे तोडले. काही निरपराध तरुणांना ताब्यात घेतले. त्यामुळे वातावरण चिघळले. मुकेश मोरे या तरुणाला ताब्यात घेताना त्याचा आजोबा दतु गणपती मोरे (वय ६० ते ६५ ) या वृध्दाने आमच्या पोरानं काय केलयं, त्याला कशाला घेऊन जाता असे विचारले असता पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वृद्धाला धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामुळे वातावरण अधिक चिघळले.

दतु गणपती मोरे यांचा बळी जाताच सर्व गाव एकत्र आला.प्रेत घेऊनच ते उमरगा पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी ठिय्या आंदोलन करून दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

सचिन पाटील एसपी असताना मे २०१४ मध्ये कनगरा गावात जे घडले होते अगदी तसेच एसपी आर. राजा यांच्या काळात तलमोड गावात घडले आहे. जुने एसपी पंकज देशमुख यांच्या काळात पोलीस यंत्रणा ढेपाळली होती. त्या काळात लागलेली खाबुगिरीची सवय सुटायला तयार नाही. उमरगा पोलीस स्टेशन म्हणजे सोन्याचे अंडे देणारे पोलीस स्टेशन आहे. येथे येण्यासाठी सर्वात जास्त बोली लावली जाते. खऱ्या आरोपीना सोडून द्यायचे आणि निरपराध लोकांवर मर्दुमकी दाखवयाची ही पोलिसाना जुनी सवय जडली आहे.

नवे एसपी आर. राजा यांच्याकडून लोकांच्या अनेक अपेक्षा होत्या. पंकज देशमुख यांच्या काळात ढेपाळलेली पोलीस यंत्रणा सुरळीत होईल असे वाटले होते. पण हाताखालील अधिकारी फितूर होत असल्याने आर राजा एकटे काय करणार ? आभाळच फाटले आहे तर ठिगळ कुठं कुठं लावणार ?

या संपूर्ण घटनेची राज्याच्या गृह विभागाकडून चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे. इतकेच काय तर अश्या पोलिसांना बडतर्फ केले पाहिजे. तरच भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यावर अंकुश बसेल. ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत, या ब्रीदवाक्याला काळिमा फासणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.

सुनील ढेपे
संपादक, उस्मानाबाद लाइव्ह
9420477111

Post a Comment

0 Comments