तीन विद्यमान आमदार 'डेंजर झोन'मध्ये !

उस्मानाबाद - लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता वेध लागलेत विधानसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा जसा  अंडरकरंट दिसला तसाच  विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा दिसल्यास राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या एका आमदाराचा दारुण पराभव होऊ शकतो. हे तिन्ही विद्यमान आमदार सध्या डेंजर झोनमध्ये दिसत आहेत.

गेल्या पाच वर्षात भाजप - शिवसेना युती सरकारने चांगली कामगिरी केली आहे, त्यात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप - एनडीएचे सरकार आल्यामुळे भाजप - शिवसेना युतीला सुगीचे दिवस आले आहेत. होऊ घातलेली विधानसभा निवडणूक युतीला सोपी तर  आघाडीला जड  जाईल, असे चित्र दिसत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना तसेच  काँग्रेस - राष्ट्रवादी वेगवेगळे लढूनही भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, त्या खालोखाल जागा  शिवसेनेला मिळाल्या होत्या, हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सुपडा साफ होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यात वंचीत बहुजन आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका  बसेल, असेही बोलले जात आहे.
उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील ( राष्ट्रवादी ) यांचा लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. ते पुन्हा विधानसभा निवडणूक लढवणार हे निर्विवाद सत्य आहे. मागील  विधानसभा निवडणुकीत ते दहा हजार मतांनी विजयी झाले होते, मागील निवडणुकीत भाजप उमेदवार संजय पाटील दुधगावकर यांना जवळपास 30 हजार मते पडली होती, शिवसेना - भाजप उमेदवार यांची मतांची बेरीज राष्ट्रवादीपेक्षा  जास्त आहे, तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना  उस्मानाबाद - कळंबमधून  जवळपास 8 हजार मते जास्त मिळाली  आहेत. एकंदरीत रागरंग पाहता राणा जगजितसिंह पाटील डेंजर झोन मध्ये दिसत आहेत.
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. संभाव्य उमेदवार म्हणून उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.मकरंद राजेनिंबाळकर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास बिग फाईट होऊ शकते.

राहुल मोटे अडचणीत
विजयाची हॅटट्रिक मारणारे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल मोटे ( राष्ट्रवादी ) हेही यंदा डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना परंडा मधून 21 हजार 500 मतांची आघाडी मिळाली  आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे राहुल मोटे यांना आतापर्यंत विजय मिळत आला आहे. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि शंकरराव बोरकर वादात राहुल मोटे याची पोळी भाजत आली आहे.  या दोघांच्या वादामुळे आता संपर्कप्रमुख तानाजी सावंत स्वतः  परंडा मधून उभा राहणार असल्यामुळे मोटेच्या अडचणी वाढल्या आहेत. सावंत निवडणूक आखाड्यात उतरल्यास राहुल मोटे यांची मोठी दमछाक होणार आहे.

मधुकररावांचा राजकीय संन्यास
विरोधकांत ताळमेळ नसल्याने तुळजापुरात काँग्रेसचे बुजुर्ग नेते मधुकरराव चव्हाण यांना सतत लॉटरी लागत आली आहे, त्यांचे वाढते वय लक्षात घेता मतदारांनी आता त्यांना राजकीय संन्यास घेण्याचा सल्ला दिला आहे, मात्र ते पुन्हा निवडणूक रिंगणात दंड थोपटून उभे राहिल्यास यंदा त्यांची  मोठी दमछाक होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना तुळजापूरमधून  19 हजार 330 मतांची आघाडी मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा पद्धतशीरपणे काटा काढला, त्यामुळे सर्वजण चव्हाण यांच्यावर चिडून आहेत. ते चव्हाण यांना कितपत सहकार्य करणार ? हा एक गहन प्रश्न आहे. त्याचबरोबर चव्हाण यांची आता सद्दी संपली असून त्यांनी स्वतःहुन राजकीय संन्यास घेऊन नव्या  कार्यकर्त्यास संधी देण्याची गरज आहे, मात्र तसे न केल्यास चव्हाण सर्व बाजूने घेऱ्यात सापडू शकतात.
तुळजापूर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास ऍड अनिल काळे, रोहन देशमुख यांचे नाव पुढे येऊ शकते. वंचीत आघाडीकडून  महेंद्र काका धुरगुडे, अशोक जगदाळे तयार आहेत, असे घडल्यास तिरंगी लढतीत चव्हाण मागे पडू शकतात.शिवसेना - भाजप  एकत्र लढल्यानंतर तुळजापूर मतदारसंघ कधी शिवसेनेच्या  तर कधी भाजपच्या वाट्याला आला आहे. यंदा मात्र भाजपला हा मतदारसंघ मिळेल, अशी चिन्हे आहेत.

Post a Comment

0 Comments