राणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर ?

उस्मानाबाद : उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. त्यात एका मोठ्या वृत्तपत्रात आज बातमी झळकल्याने या चर्चेला मोठे तोंड फुटले आहे. मात्र या फक्त बातम्याच असून त्यास अद्याप दुजोरा मिळाला नाही.


राजकारणाची हवा कोणत्या दिशेने वाहते हे अचूकपणे ओळखणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याच पक्षाची हवा बदलल्याचं चित्र आहे. कारण, उस्मानाबादमध्ये निकटवर्तीय नेत्याच्या बॅनरवरुनच शरद पवारांचा फोटो गायब झालाय. पवारांचे नातेवाईक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटील पाटील कुटुंबाच्या बॅनरवर पवारांचाच फोटो नसल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.त्यामुळे राणा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अधिक रंगली आहे.


उस्मानाबाद आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2017 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचे 56 कोटी मंजूर झाल्याचे होर्डिंग उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. मात्र या होर्डिंगवर केवळ माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या पिता-पुत्रांचे फोटो झळकले आहेत. पवारांचा फोटो आणि पक्षाचं चिन्ह नसल्याने वाऱ्याची दिशा बदलली का अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
 
 


राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता, त्यामुळे ते बॅकफूटवर आले आहेत.त्यात राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपात जात असल्याने राष्ट्रवादीचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राणा पाटील यांची मोठी दमछाक होणार आहे.


लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळणार असल्याचे सर्व्हेक्षण समोर आल्याने आणि विरोधात किती दिवस राहायचे यामुळे राणा पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या गेल्या काही दिवसापासून उठल्या आहेत. राष्टवादीचे नेते अजित पवार आणि राणा पाटील यांचे संबंध ताणले गेल्याने ते भाजपमध्ये नक्की जाणार अशी कुजबुज सुरु आहे. व्हाट्स अँप ग्रुप आणि काही स्थानिक वृत्तपत्रात या संदर्भात वारंवार बातम्या पेरल्या जात आहेत. त्यात एका मोठ्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्याने या चर्चेला मोठे तोंड फुटले आहे.


उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादी आणि भाजपची आघाडी आहे. भाजपचे राज्य सरचिटणीस , स्थानिक आमदार सुजितसिंह ठाकूर आणि राणा पाटील यांच्यात सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे या बातम्या लोकांना सत्य वाटायला लागल्या आहेत. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि राणा पाटील यांच्या पत्नी , जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांनी याचा साफ इन्कार केला आहे.


केवळ बातम्याच – दत्ता कुलकर्णी
राणा पाटील हे भाजपमध्ये येणार या फक्त बातम्याच असून त्यात तथ्य नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना सांगितले. राणा पाटील भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे मला तरी माहित नाही. पक्षश्रेष्ठीने अजून तरी यासंदर्भात विचारणा केलेली नाही, या बातम्या कोण पेरत आहे , हे मला माहित नसल्याचेही त्यांनी सांगितले.


तथ्य नाही – सौ. अर्चनाताई पाटील
राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये जाणार का ? यासंदर्भात राणा पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी या बातम्यात तथ्य नसल्याचे सांगितले. असं काही ठरलेलं नाही अश्या त्या म्हणाल्या. आपण आजारी असून उपचारासाठी बंगलोरला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments