राणा जगजितसिंह यांचे अखेर ठरले ! अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा  भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे.  सोलापुरात १ सप्टेंबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या  उपस्थितीत राणा जगजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी  ३१ ऑगस्ट रोजी ते आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 1 सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत येत आहे. त्यानंतर  ही यात्रा सोलापुरात पोहचणार असून, याच दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. समारोपप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आदी राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राजकीय गोटात मोठा भूकंप होत आहे. 

31 ऑगस्ट रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार !
 
उस्मानाबादेतील लेडीज क्लबच्या मैदानावर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राणा जगजीतसिंह पाटील हे आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. "मला तुमच्याशी काही बोलायचयं" असे आवाहन करीत त्यांनी "परिवार संवाद" ठेवला आहे. यानिमित्त त्यांनी फेसबुकवर भावनिक साद सुद्धा घातली आहे.
आमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त सर्वप्रथम उस्मानाबाद लाइव्हने दिले होते, त्यानंतर वेळोवेळी त्यावर फ्लॅश टाकला होता, अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

भवितव्य काय ? 
 
आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, पण केवळ शरद पवार यांच्या आग्रहामुळे  त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव  झाला होता. विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांनी भाजपचे तोरण बांधले आहे. भाजप आणि शिवसेनची युती फिस्कटली तर उस्मानाबाद आणि युती झाली तर तुळजापूर मतदारसंघातून ते 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

शिवसेनेची कोंडी 
 
राणा जगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

Post a Comment

0 Comments