राणा जगजितसिंह यांनी पक्ष बदलला तरी आव्हान कायम !

उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेवून  भाजपमध्ये प्रवेश केला. राणा जगजितसिंह  यांनी पक्ष बदलला तरी त्यांच्यासमोरील आव्हाने कायम आहेत. राष्ट्रवादीपेक्षा  मित्रपक्ष असलेला शिवसेना त्यांच्यासाठी काटेरी मार्ग आहे. मात्र पूर्वीपेक्षा लढाई सोपी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर  अनेक वर्ष डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिलेले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील कोणत्याही पक्षात गेले तरी मतदारानी  त्यांना निवडून दिले होते, म्हणूनच सतत सात वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला होता. प्रत्येक निवडणुकीत नवा विरोधक तयार होत असे आणि  चारी मुंड्या चित झाला की नंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे मांडलिकत्व पत्करत असे. त्यामुळेच १९७८ ते २००४ पर्यंत डॉ. पद्मसिंह पाटील या मतदारसंघाचे नावाप्रमाणे  ‘सिंह’ होते.२००९ च्या लोकसभा निवडणुकीत ते खासदार म्हणून निवडून आले पण शपथविधी होण्याअगोदरच त्यांना कै.पवनराजे निंबाळकर खून प्रकरणी अटक झाली आणि त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागले.

२००६  मध्ये  कै.पवनराजे निंबाळकर यांचा खून झाला आणि त्यानंतर  ओमराजे निंबाळकर यांचा राजकारणात उदय झाला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कै.पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांनी  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला आणि पाटील पिता – पुत्राचे राजकारण संपुष्टात  येते की काय अशी शंका उपस्थित केली जावू  लागली पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव करून पुन्हा एकदा  वर्चस्व प्राप्त केले.जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक काबीज केली. त्यामुळे त्यांचा राजकारणात पुन्हा एकदा दबदबा निर्माण झाला.

सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचा पत्ता कट होवून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली आणि  ते निवडूनही आले त्यामुळे  विजनवासात गेलेले ओमराजे पुन्हा सक्रिय झाले. याच लोकसभा निवडणुकीत आमदार असलेल्या राणा जगजितसिंह यांना दारुण पराभव पत्करावा लागला आणि ते पुन्हा बॅकफूटवर आले. इच्छा नसतानाही केवळ शरद पवार यांच्या आग्रहामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती पण होऊ घातलेली विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी कठीण वाटू लागली.
विधानसभा निवडणूक सोपी जाण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीशी काडीमोड घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीकडे त्यांच्याविरुद्ध तुल्यबळ उमेदवार  नाही. भाजपला जागा सुटल्यास शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांची मोठी कोंडी होणार आहे. ओमराजेने कोणता डमी उमेदवार उभा केला तरी उघड प्रचार ते करू शकणार नाहीत. शिवसेनेचे नेते आणि काही कार्यकर्ते यांचा छुपा विरोध  हेच राणा जगजितसिंह यांच्यासमोरील  मोठे आव्हान राहणार आहे. मात्र शिवसेनेकडे जागा राहिल्यास राणा जगजितसिंह यांना उस्मानाबाद ऐवजी तुळजापूरमधून निवडणूक लढवावी लागेल आणि या मतदारसंघात काँग्रेसचे बुजुर्ग नेते, विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांचे आव्हान असणार आहे. तुळजापूरपेक्षा उस्मानाबाद – कळंब मतदारसंघ राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी सोपा राहील, पण कोणत्या मतदारसंघातून ते निवडणूक लढवतात, यावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

Post a Comment

0 Comments