मधुकररावांना पराभूत करण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली

तुळजापूर – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास अवघे काही दिवस उरले असताना, तुळजापूर मतदारसंघात आतापासूनच आरोप – प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत. पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आणि सलग चार वेळा निवडून आलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यावर  इच्छुक उमेदवार अशोकभाऊ जगदाळे यांनी आतापासूनच टीकास्त्र सोडले आहे. चव्हाण यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांनी कंबर कसली आहे.

तुळजापूर मतदारसंघ हा ऐकेकाळी शेकापचा बालेकिल्ला होता.शेकापचे  कै. माणिकराव खपले हे आलटून – पालटून तीन वेळा निवडून आले होते. खपले यांच्या निधनानंतर शेकाप या तालुक्यातून हद्दपार झाला असून, काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण आणि नरेंद्र बोरगावकर या जोडगोळीने तुळजाभवानी साखर कारखाना, तुळजाभवानी सूतगिरणी, श्री खंडोबा पणन आदी संस्था उभ्या केल्या, मात्र या सर्व सहकारी संस्था सध्या  बंद असून, त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जातोय. तसेच या सर्व संस्थेवर आमदार मधुकरराव चव्हाण यांनी स्वतःच्या मुलाची आणि नातेवाईकांची वर्णी लावली आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या मुलाला निवडून आणले आहे.

सहकारी संस्थेत झालेला गैरव्यवहार आणि नातेवाईकांची वर्णी यावरून नळदुर्गचे सामाजिक कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अशोकभाऊ जगदाळे यांनी आमदार मधुकरराव चव्हाण यांना लक्ष्य केले आहे. वृत्तपत्रात बातम्या दिल्या जात नाहीत म्हणून त्यांनी चक्क जाहिरातीच्या माध्यमांतून चव्हाण यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आमदार मधुकरराव चव्हाण हे काँग्रेसचे सर्वात बुजुर्ग नेते आहेत. वय ८० झाले तरी यंदाही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही ते २९ हजार मतांनी विजयी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले असतानाही चव्हाण यांचा विजय आश्चर्यकारक होता. विरोधकांत मतविभागणी होऊन चव्हाण यांचा विजय सोपा होतो. विरोधकांत फाटाफूट हीच चव्हाण यांची जमेची बाजू आहे. यंदाही अशोकभाऊ जगदाळे, महेंद्रकाका धुरगुडे, देवानंद रोचकरी इच्छुक आहेत. भाजपचा आणि वंचितचा उमेदवार राहणार आहे. बंडखोरी मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे चव्हाण यांना पराजित करणे विरोधकांपुढे एक मोठे आव्हान राहणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चव्हाण सर्व विरोधकांना भारी पडणार की  विरोधक त्यांना पराभूत करण्यात  यशस्वी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments