चारही विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती होणार

उस्मानाबाद – विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु असून, काही अपक्ष उमेदवारांनीही कंबर कसल्याने चारही विधानसभा मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
 
उस्मानाबाद – कळंब मतदारसंघ
उस्मानाबाद – कळंब   हा मतदारसंघ  राष्ट्रवादी – काँग्रेस आघाडी झाल्यास  राष्ट्रवादीकडे आणि शिवसेना – भाजप युती झाल्यास शिवसेनेकडे राहिलेला आहे. या  मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये प्रवेश केल्याने या मतदारसंघाचे चित्र बदलले आहे.हा मतदारसंघ भाजपला मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जर शिवसेनेने ताणून धरल्यास राणा जगजितसिंह पाटील यांना  उस्मानाबाद सोडून तुळजापूरमधून निवडणूक लढवावी लागणार आहे.
 
शिवसेनेकडून शंकरराव बोरकर, कळंबचे माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, कळंबचे अजित पिंगळे, संजय पाटील दुधगावकर आदींची नावे  आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीकडून जीवनराव गोरे, अमित शिंदे, सक्षणा सलगर यांची नावे  आघाडीवर आहेत. भाजकडून राणा जगजितसिंह पाटील यांचे नाव फिक्स झाले आहे.
 
तुळजापूर मतदारसंघ
तुळजापूर मतदारसंघात उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे समाविष्ट आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर तुळजापूर बरोबर उस्मानाबादमधील नेत्यांचा डोळा आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार  आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते मधुकरराव चव्हाण सलग चार वेळा निवडून आले आहेत. विरोधकांमध्ये मतविभागणी होत असल्यामुळे चव्हाण बाजी मारत आहेत.  राणा जगजितसिंह पाटील तुळजापूरमधून लढल्यास चव्हाण यांची मोठी दमछाक होणार आहे. नळदुर्गचे अशोक जगदाळे यांनीही चव्हाण यांना आव्हान दिले आहे. महेंद्र धुरगुडे, देवानंद रोचकरी काय भूमिका घेतात ? याकडेही लक्ष वेधले आहे.
 
राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबादमधून लढल्यास भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार ? याकडे लक्ष वेधले आहे. रोहन देशमुख, ऍड. अनिल काळे, रामदास कोळगे, ऍड व्यंकट गुंड असे डझनभर कार्यकर्ते भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेकडून संजय निंबाळकर यांनी जोर लावला आहे.
 
भूम – परंडा मतदारसंघ
राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राहुल मोटे यांनी सेनेतील गटबाजीचा फायदा उठवत हॅटट्रिक मारली आहे. चौकार मारण्यासाठी ते सज्ज आहेत. शिवसेनेकडून पालकमंत्री  तानाजी सावंत, शंकरराव बोरकर यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील ऐनवेळी कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष वेधले आहे.
 
उमरगा मतदारसंघ
शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले हे लोकसभेच्या निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांची बाजू घेत लढले होते.तरीही सेनेकडे पर्याय नसल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. ते सलग दोन वेळा निवडून आले असून हॅटट्रिक मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. काँग्रेसकडून डझनभर इच्छुक आहेत. काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळते याकडे लक्ष वेधले आहे. 
 
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी तुटल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार राहणार आहेत. तसेच  बंडखोरी होण्याची शक्यता असल्याने सर्वच मतदारसंघात तिरंगी आणि चौरंगी लढती  होणार आहेत.

Post a Comment

0 Comments