वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना बाधित तरुणाचा मृत्यूउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी मयत कोरोना बाधित तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधिताचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या भावाने केला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृताने उपचारादरम्यान भावाला पाठविलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये अशा प्रकारचे आरोप प्रशासनावर आरोप केले आहेत. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

आसू (ता. परंडा) येथील एकाला निमोनियाच्या कारणावरून बार्शी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा स्वॅब अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने त्याला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना रविवारी (ता. पाच) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मृताच्या भावाने सांगितले, की माझा भाऊ उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात ३० जूनला दाखल झाला होता.मात्र कोणीही दखल घेतली नाही.

भावाने दिलेल्या माहितीनंतर मी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना फोन करून हा प्रकार सांगितला. खासदारांच्या सूचनेनंतर प्रशासनाने उपचार सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ऑक्सीजन सुरू नव्हता. तसेच डॉक्टरही नसल्याचे भावाने सांगितले. त्यामुळे पुन्हा मी खासदारांना पहाटे तीन वाजता फोन लावून माहिती दिली.खासदारांनी प्रशासनाला पुन्हा सांगितल्यानंतर ऑक्सीजन सुरु केला. मात्र त्यानंतर पुन्हा तीन चार दिवस रात्रीच्या वेळी माझ्या भावाला ऑक्सीजन पुरवठा झाला नाही. अखेर रविवारी (ता. पाच) पहाटे भावाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

उपचारातील हलगर्जीपणामुळे आमच्यासोबत असे घडले. इतर कुणासोबत असे घडू नये. काय प्रकार आहे, ते कळत नाही. मात्र ऑक्सिजन दिला नाही. त्यामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला. 
- मृताचा भाऊ 

रुग्ण अत्यवस्थ असल्याने उपचारास प्रतिसाद देत नव्हता. आम्ही ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवला होता. आमच्याकडून रुग्णाची योग्य ती काळजी घेतली जात होती. - डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा शल्यचिकीत्सक 

Post a Comment

0 Comments