कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा- पालकमंत्रीउस्मानाबाद -  जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९४६ इतकी असून त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित  रुग्णांचा मृत्यूदर ४.७ इतका असून हा दर राज्याच्या मृत्युदर पेक्षा अधिक असल्याने मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.


     जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा covid-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री गडाख बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार कैलास घाडगे- पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि. वडगावे व अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

      पालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात जे  कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील अत्यंत गंभीर रुग्णांची स्वतंत्र यादी तयार करावी व या गंभीर रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करण्याबाबत लक्ष केंद्रित करावे व हे रुग्ण पूर्णपणे बरे होतील यासाठी प्रयत्न करावेत व जेणेकरून जिल्ह्यात  कोरोनामुळे मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.

       राज्यातील इतर जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्या मानाने नियंत्रित आहे परंतु पुढील काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी. त्यासाठी आवश्यक सर्व इतर सुविधाही उपलब्ध कराव्यात,असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.

     जिल्ह्यात  कोरोना बाधित रुग्ण आहे परंतु या रुग्णांना कोविड आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे व त्यांच्या इच्छेनुसार  होम क्वॉरंटाईन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा थोडासा ताण कमी होऊन जे गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल येईल. असे पालकमंत्री गडाख यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या  व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवल्यानंतर त्या व्यक्तींचा रिपोर्ट येईपर्यंत एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.

      कोविड च्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जी पदभरतीची प्रक्रिया राबविली आहे त्या अंतर्गत आतापर्यंत फक्त १०० पदांची भरती केलेली दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी  ८ ऑगस्ट २०२० पर्यंत उर्वरित १५० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश श्री. गडाख यांनी दिले. तसेच प्रशासनाने खासदार निधीतून तात्काळ एक रुग्णवाहिका खरेदी करून ती आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करावी असेही त्यांनी सूचित केले.

 जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णावर उपचार करण्याबाबत पुढे यावे. या करीता जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत जे रुग्णालय आहेत. त्यांनीही ही कोविड रुग्णांवर उपचार करावेत व पुढील काळासाठी मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. तसेच परंडा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी करण्याबाबत तेथील लोकप्रतिनिधींनी चार महिन्यापूर्वी पत्र देऊनही त्यावर आतापर्यंत का कारवाई करण्यात आलेली नाही याची चौकशी करून त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

     जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरिता डॅशबोर्ड तयार करून त्यावर रुग्णालय निहाय बेडची उपलब्धतेची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच पोलिस विभागाने लॉकडाऊन मध्ये अधिक कडक पद्धतीने काम करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना पालकमंत्री गडाख यांनी केली. प्रशासनाने दहा हजार रॅपिड टेस्ट किट्सची उपलब्धता करून त्या किट्स तालुकानिहाय उपलब्ध करून द्याव्यात व मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट कराव्यात अशीही सूचना त्यांनी केली.

    उस्मानाबाद शहरात १ ऑगस्ट पासून दुचाकीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने १ दिवस अंमलबजावणी करून त्याचा पुनर्विचार करावा तसेच आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय व सूचना याबाबत रोज आढावा घेऊन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.

   प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी covid-19 च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली तसेच जिल्ह्याचा मृत्युदर ४.७ इतका असून तो कमी करण्या बाबत प्रशासनामार्फत उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. असे सांगितले. तसेच १० हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध होणार असून त्यामुळे तपासण्याची संख्या वाढणार आहे असे सांगून आणखी २० हजार रॅपिड टेस्ट किट्स ची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच प्रशासनामार्फत पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी खासदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी करावे असे सांगितले. तसेच प्रशासनाने कोरोना अनुषंगाने उपाय योजना राबवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी इतर लोकप्रतिनिधी

 यांनी कोरोनाच्या अनुषंगाने सूचना व प्रश्न मांडून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments