उस्मानाबाद शहर बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'उस्मानाबाद - सुरुवातीचे ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच शिरकाव  आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३५४ वर पोहचला आहे. धक्कादायक म्हणजे उस्मानाबाद शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर असून अद्याप शनिवारी सकाळी पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत.

 पहिल्या दोन महिन्यात एकअंकी संख्येवर असलेल्या काेरोनाबाधीतांच्या संख्येने नंतरच्या काळात शतकोत्तर वाटचाल केली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी, महात्मा गांधी नगर, रामनगर, उस्मानपुरा, झोरी गल्ली, काळा मारुती चौक, बोंबले हनुमान चौक, नेहरू चौक, पापनाशनगर असे एक ना अनेक कंटेनमेंट झोन शहरात तयार झाले आहेत.शनिवारी सहा कैदी आणि एका पत्रकाराचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.

हा पत्रकार जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेस हजर होता, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि अनेक पत्रकार होम क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे.


मुरुममध्येही कोरोनाचा शिरकाव

उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात पालिका प्रशासन, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या दक्षतेमुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. परंतु, लातुर येथील विवाह सोहळ्यास गेलेल्या शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. मुरूम येथील एक जण सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत असल्याने मुरूम शहरातही कोरोनाने शिरकाव झाल्याने धावपळ उडाली आहे.


उमरगा तालुक्यात ५६ कोरोना बाधित
उमरगा शहरातील कोविड उपजिल्हा रूग्णालयातील तीन कर्मचारी आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी तालुक्यात चार जण पॉझिटिव्ह आल्याने त्यात खासगी डॉक्टर अाणि रुग्णालयातील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील एक मुलगा, शहरातील एक ज्येष्ठ नागरिक तर मुरूम येथील एकाचा समावेश आहे.

वालवडमध्येही सापडला रुग्ण
भूम तालुक्यातील वालवड येथे शुक्रवारी रात्री महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला कुकड़गाव रोड़वरील माळी वस्ती येथील असून ही वस्ती सील केली आहे. सदरील महिला राळेसांगवी येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे.

सोलापुरात उपचार घेणारे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह
आरळी बु.(ता. तुळजापूर) व वाशी तालुक्यातील तेरखेडा, पारडी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.हे तिघेही सोलापूर येथे उपचार घेत असून तेथेच स्वॅब घेतले होते. त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments