उस्मानाबादेत बियाणे कंपनीविरुद्ध गुन्हे दाखलउस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती याप्रकरणी बियाणे उत्पादक कंपन्यांच्या विरोधात शहरातील आनंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  त्यानंतर रविवारी (ता. पाच) दोन बियाणे उत्पादक कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांच्या गोटात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपायी न देणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या वर्षात मोठ्या प्रमाणात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षानंतर यंदा जून महिन्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तर काही भागात अतिपावसाने बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी जिल्ह्यात अनेक कंपन्यांचे बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्याने बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्याने कृषी विभागाला पंचनामे करण्याच्या सुचना आल्या होत्या.


चार हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण

जिल्ह्यात सुमारे चार हजार ६२१ शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये पाच हजार १२१ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर चार हजार ६३२ हेक्टर क्षेत्रावरील चार हजार चार शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांकडून नुकसानभरपायीची मागणी केली जात आहे.


कृषी विभागाची बैठक
दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वच कंपन्यांनी बियाणे बदलून देणे अथवा नुकसान भरपायी देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही बियाणे कंपन्या याबाबत शेतकऱ्यांना सहकार्य करण्यास तयार नाहीत. अनेक शेतकऱ्यांनी पदरमोड करीत दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे अशा कंपन्यावर कारवाई करण्याच्या सुचना वरीष्ठ स्तरावरून आल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे.


बियाणे कंपन्यांनी ही वेळ आणायला नको होती. ज्या कंपन्यांनी बियाणे बदलून दिले नाही, अथवा पैसे परत दिले नाहीत, अशा कंपन्यांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे काही कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असून उर्वरीत कंपन्यांच्या विरोधात गु्न्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बजरंग मंगरुळकर, अधीक्षक कृषी अधिकारी 

Post a Comment

0 Comments