उस्मानाबाद जिल्हा लॉकडाऊन : आदेशातील परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र. 1,4 व 5 मध्ये दुरुस्ती
उस्मानाबाद :- कोरोना कोविड-19 विषाणुमुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यासाठी व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी  दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यत उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत आदेश पारित केलेले आहेत.

या आदेशातील परिशिष्ट 2 मधील मुद्दा क्र. 1,4 व 5 मध्ये दुरुस्ती करण्यात येत असून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

सर्व मार्केट, दुकाने ही सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उघड़ी राहतील. तथापि,कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतराचे (Social Distancing) निकष पाळले गेले नाही अथवा गर्दी  केल्यास सदरचे मार्केट, दुकाने शासकीय यंत्रणेकडून तात्काळ बंद करण्यात येतील.

उस्मानाबाद जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल पंप सकाळी 8 ते दुपारी 3 या वेळेत चालू राहतील. तथापि उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज 24 तास (24x7) चालू राहतील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. तसेच दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास परवानगी राहील.

सर्व प्रकारची औषधी दुकाने, फार्मसी, जन औषधी केंद्र आणि वैद्यकीय उपकरणांची दुकाने (चष्म्याच्या दुकानांसह) सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहतील. फक्त सर्व सरकारी व खाजगी  रुग्णालयास संलग्न असलेली मेडिकल्स दररोज 24 तास (24x7) चालू राहतील.

संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात बी-बियाणे व खते या कृषि निविष्ठांची विक्री करणारी दुकाने, आस्थापना, बीज प्रक्रिया केंद्र, त्यानुषंगीक बियाणे पॅकींग, हाताळणी केंद्र, बीज परीक्षण प्रयोगशाळा, कृषी यंत्रसामग्री, त्यांचे सुटे भाग (त्याच्या पुरवठा साखळीसह) व त्यांच्या दुरुस्तीची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत चालू राहतील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहतील.

रेस्टॉरन्टमध्ये फक्त स्वयंपाक गृह चालू ठेवून अन्न पदार्थाची घरपोच सेवा (होम डिलीव्हरी) देण्यास सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत परवानगी राहील.

किराणा दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत चालू राहतील. भाजीपाला मार्केट, भाजीपाला विक्री, दूध विक्री, दूध विक्री केंद्र दररोज सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत चालू राहतील.

उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गावरील धाबे दररोज 24 तास (24 x 7) चालू राहतील. पान, तंबाखू इत्यादी पदार्थाची दुकाने बंद राहतील.

दि. 4 मे 2020 या आदेशामध्ये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.

दि. 11 मे 2020 या आदेशामध्ये नमूद गृहविलगीकरण (Home Quarantine) च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.

मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स, सिनेमागृहाव्यतिरिक्त सकाळी 9.00 ते दुपारी 3.00 या वेळेत दिनांक 05 ऑगस्ट 2020 रोजीपासून सुरु राहतील. मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील फुड कोर्ट, रेस्टॉरंट्स फक्त त्यांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी सुरु ठेवता येतील. मात्र कोविड-19 चा प्रादुर्भाव पसरु नये यासाठीच्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित करुन दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीचे त्यांनी काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने नागरिकांनी दुपारी 3.00 नंतर वैद्यकीय तातडीची निकड वगळता इतर कारणासाठी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच दर शनिवारी जनता कर्फ्यू राहील.

या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments