उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ ? विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या मागणीला यश


उस्मानाबाद : उस्मानाबादसाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्यात यावे ही मागणी घेऊन स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समिती, उस्मानाबाद च्या वतीने सरकार दरबारी व रस्त्यावर देखील विविध लोकशाही मार्गाने मागील दोन वर्षांपासून सातत्याने लढा सुरू आहे. 


त्यासाठी उस्मानाबाद मधील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी,युवक व विविध राजकीय पक्ष  संघटना तसेच सामाजिक संघटनेत कार्यरत असलेल्या युवकांची एकत्रित बैठक दिनांक १८ सप्टेंबर,२०१८ रोजी शासकीय विश्रामगृहात येथे पार पडली होती. या बैठकीत स्वतंत्र विद्यापीठ निर्माणाचा लढा  उभारण्याच्या उद्देशाने स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समिती ची स्थापना करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. 


या नंतर समितीने बैठका घेऊन विद्यार्थी व युवकांची मोट बांधली. विद्यापीठाची मागणी ही फक्त कागदावरच राहू नये या उद्देशाने रस्त्यावर उतरत दिनांक ३१ जुलै,२०१९ रोजी समितीने विद्यार्थी-विध्यार्थीनी व युवकांना घेऊन जिजाऊ चौक बार्शी नाका येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढला होता. 


मागच्या सरकारमधील राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची दिनांक २० आॅगस्ट,२०१९ रोजी समितीचे अध्यक्ष अॅड.संजय भोरे,कार्याध्यक्ष संजय तनमोर,अॅड.संदिप देशमुख,आकाश माळी,आकाश कावळे यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेऊन स्वतंत्र विद्यापीठाची मागणी केली होती.

त्यानंतर दिनांक १८ फेब्रुवारी,२०२० रोजी संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड.संजय भोरे यांच्यासह समितीच्या शिष्टमंडळाने कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची आग्रही मागणी केली होती. यावेळी ठाकरे यांनी देखील आपण या बाबतीत लवकरच पावले उचलू असा खंबीर विश्वास देत समितीने दिलेले निवेदन हे तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयास सादर करण्याचे आदेश त्यांच्या सचिवांना दिले होते.  


 नुकतीच दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे विद्यमान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये उस्मानाबाद येथील उपकेंद्राचे रूपांतर विद्यापीठात करता येऊ शकेल का यावर अभ्यास करण्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. 


 स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीची मुहूर्तमेढ खंबीरपणे रोवत विद्यापीठाचा लढा अखंड तेवत ठेवल्या बद्दल स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीवर विद्यार्थी व युवकांमधुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.नजीकच्या काळात लवकरच विद्यापीठाला हिरवा कंदील मिळेल अशी आशा उस्मानाबादकरांना आहे. 


दरम्यान जिल्ह्यातील काही नगरपालिका, ग्रामपंचायत व पंचायत समिति,जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्था यांना विद्यापीठाच्या मागणीचे ठराव देण्याबाबत संघर्ष समितीने विनंती केली असून कोरोणा मुळे त्यामध्ये अडचणी येत असल्याबाबत समतीचे कार्याध्यक्ष संजय तनमोर व उपाध्यक्ष विक्रम राऊत यांनी सांगितले असून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानीही लवकरच याबाबत सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments