उस्मानाबाद : अर्जुन पुरस्कार प्राप्त सुवर्णकन्या कु.सारिका काळेचा सत्कारउस्मानाबाद - श्रीपतराव भोसले हायस्कूलची माजी विद्यार्थिनी कु.  सारिका काळे या गुणवान खेळाडुला राष्ट्रीय पातळीवरील नामांकित असा अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला. ही  बातमी आदर्श शिक्षण परिवारासाठी व पूर्ण मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अतिशय गौरव पूर्ण व मान उंचावणारी ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणाचे औचित्य साधून आदर्श प्रसार शिक्षण प्रसारक मंडळाने आज दिनांक 19 ऑगस्ट 2 2020 रोजी कुमारी सारिका काळे हिचा श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित केला होता .

या सत्कार सोहळ्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर आण्णा पाटील , आदित्य पाटील, सारिका काळे यांचे प्रशिक्षक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर वाघ साहेब उपस्थित होते.

कु.  सारिका काळे हिचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये  झालेले आहे. कुमारी सारिका काळेने 2005 साली इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतला व 2012 मध्ये ती बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झाली. शाळेत असताना तिला खोखो या खेळाची आवड होती. तिच्या या खेळाडू वृत्तीला हेरून शाळेतील क्रीडा शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. शिवाय शाळेतील खो खो मैदानावर भरपूर सराव करून घेतला, याचे फलित म्हणून तिने शालेय स्तरावर व महाविद्यालयीन स्तरावर अनेक स्पर्धेमध्ये विजय मिळवला. शालेय क्रीडा स्पर्धा, जिल्हा क्रीडा स्पर्धा ,राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवला व ती विजयी झाली.

कुमारी सारिका काळे हिने आतापर्यंत एकूण 15 राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला व तिने अनेक वेळेला सुवर्णपदक मिळवले. कुमारी सारिका काळेची  राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कर्णधार म्हणून निवड झालेली होती. सारिका ने तिसऱ्या आशियाई खो-खो स्पर्धेमध्ये बेस्ट प्लेयर चा पुरस्कार मिळवला तसेच तिला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणूनच की काय 2015 -16 यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तिला मिळाला.


कुमारी सारिका काळे ही तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तुळजापूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या खो-खो खेळाविषयी असलेल्या प्रेमापोटी एकूण पगाराच्या 20 टक्के रक्कम त्या खो-खोच्या खेळाडूच्या मदतीसाठी देतात शिवाय अजूनही त्या खो-खो खेळाडूंना प्रशिक्षणाचे काम करतात.

सत्कारास उत्तर देताना कुमारी काळे म्हणाल्या की  अर्जुन पुरस्कार मिळण्यासाठी श्रीपतराव भोसले हायस्कूलचा सिंहाचा वाटा आहे. शालेय स्तरावर शाळेत खो-खो चा योग्य तो सराव ,प्रशिक्षण व प्रेरणा यातूनच या राष्ट्रीय पुरस्काराची जडणघडण झाली. माननीय सुधीर अण्णा पाटील यांनी श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये खो खो या खेळाला राजाश्रय दिला. गुणी खेळाडू ओळखून त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्या म्हणूनच मी  अर्जुन पुरस्कारापर्यंत मजल मारू शकले. माझी घरची परिस्थिती नाजूक असूनही सुधीर आण्णा पाटील व माझ्या सर्वच क्रीडा शिक्षकांनी मला वेळोवेळी मदत केली व मला या खेळात सातत्याने विविध स्पर्धेमध्ये सहभागी केले.

श्रीपतराव भोसले हायस्कूल हे फक्त शैक्षणिक गुणवत्तेची माहेरघर नसून या शाळेतून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले, प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी निर्माण केले. म्हणजेच देश जडणघडणाचे महान कार्य श्रीपतराव भोसले हायस्कूल मधून अविरतपणे चालू आहे. फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांमधील विविध कला गुणांना ओळखून विद्यार्थी घडवले जातात अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विद्यार्थी भोसले हायस्कूल घडवत आहे  व राहील असे उद्गार तिने सत्कारास उत्तर देताना काढले.

या सत्कारासाठी आवर्जून कु. सारिका काळे हिचे वडील श्री सुधाकर काळे साहेब त्यांच्या मातोश्री व आजी ही उपस्थित होत्या. सुधीर अण्णा पाटील यांनी तिच्या आई-वडिलांचा व आजीचा ही सत्कार केला.

सत्कार प्रसंगी बोलत असताना डॉक्टर चंद्रजीत जाधव यांनी सारिका काळे या गुणवान खेळाडूची जडणघडण कशी झाली  याची सखोल माहिती दिली. श्रीपतराव भोसले हायस्कूल चे एकूण सहा माजी खेळाडू विद्यार्थ्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला आहे. सुरुवातीपासूनच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने खेळाडू घडवण्याचे महान कार्य केले आहे. असे उद्गार काढले.

या सत्कार प्रसंगी बोलत असताना सुधीर अण्णा पाटील यांनी कुमारी सारिका काळे हिच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यापुढेही श्रीपतराव भोसले हायस्कूल मधून अनेक खेळाडू घडतच राहतील . खेळाडूंना सर्व सुख सुविधा पुरवण्याची जबाबदारी संस्थेची असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी खो-खो या खेळासाठी भव्य असे इंडोर स्टेडियम उभा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला ‌. आमच्या प्रशालेतील खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये राज्य य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत .हि माहिती दिली.

याप्रसंगी कुमारी सारिका काळे हिला घडवण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा आहे असे डॉक्टर चंद्रजीत जाधव व व बागल सर यांचाही सत्कार सुधीर आण्णा पाटील यांनी केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नन्वरे सर यांनी केले ‌. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य श्री घार्गे सर  सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments