पूर्वीच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती सांगून खासदारांकडून दिशाभूल

भाजपचे  सतीश दंडनाईक यांचा खासदारांवर पलटवार 

उस्मानाबाद -  खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक  यांनी पलटवार केला आहे. जिल्हा आणि परिसरातील भविष्याची गरज ध्यानात घेऊन कौडगाव औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी माजी राज्यमंत्री आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी पाठपुरावा करून जमीन, शाश्वत पाणी, उच्चदाबाचा वीजपुरवठा अशा सुविधा पूर्णत्वास नेल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संपूर्ण राज्यासाठी औद्योगिक धोरण निश्चित केले व त्यात उस्मानाबाद जिल्ह्यासाठी विशेष तरतुदी केल्या. पूर्वीच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती आता सांगून खासदार जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका  दंडनाईक यांनी केली आहे.


राज्यात सर्वसाधारण उद्योग घटकासाठी १५०० कोटी रुपये गुंतवणूक किंवा २००० व्यक्तींना रोजगार अशा निकषानुसार विशाल प्रकल्पाचे (मेगा प्रोजेक्ट) प्रचलित धोरण आहे. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रू.१०० कोटी गुंतवणुक अथवा २०० रोजगार या निकषावर विशाल प्रकल्प मंजुर करण्यात येणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचा कांगावा खासदारांनी केला आहे. खासदार नेहमीप्रमाणे धादांत खोटी माहिती सांगत सुटले आहेत.


 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने १/११/२०१९ रोजी नविन औद्योगिक धोरण जाहीर केले. त्यात निती आयोगाने आकांक्षित जाहीर केलेल्या इतर जिल्ह्यांसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून विशाल प्रकल्पाचा निकष हा २०० कोटींची गुंतवणूक किंवा ३५० रोजगार असा केला आहे. हे औद्योगिक धोरण १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ या पाच वर्षांसाठी आहे. 


खासदारांनी पत्रकात नमूद केलेल्या बाबी जर सरकारच्या पाच वर्षांसाठीच्या उद्योग धोरणात अंतर्भूत असतील आणि त्याचा शासन निर्णय वर्षभरापूर्वीच काढण्यात आला असेल तर त्यांची कथित बैठक कशासाठी होती, एखादा महत्वाचा निर्णय झाला असेल तर तो उद्योगमंत्र्यांनी का जाहीर केला नाही, आ. राणाजगजीतसिंह पाटील यांनी याबाबत केलेली मूळ मागणी आहे, त्याचे काय, या वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे डोळेझाक केली जात आहे, असा सवाल दंडनाईक यांची विचारला आहे.

Post a Comment

0 Comments