चालू शैक्षणिक वर्षापासून 70: 30 हे वैद्यकीय सूत्र रद्द करा - ॲड रेवण भोसले

 


उस्मानाबाद -  मराठवाड्यातील विद्यार्थ्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशाबाबत घोर अन्याय होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सध्याचे 70: 30 हे वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र चालू शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून रद्द करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

      मराठवाड्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून दरवर्षी वंचित राहात आहेत. मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयात 70 :30 या सुत्रा मुळे इतरांना प्रवेश मिळत आहे. पूर्वी वैद्यकीय महाविद्यालये संबंधीत विद्यापीठाशी संलग्न असत. महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये एकाच विद्यापीठाशी म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाशी संलग्न आहेत .त्यामुळे 70: 30 हे वैद्यकीय प्रवेशाचे सूत्र कालबाह्य ठरते. वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर नीट ही प्रवेश परीक्षा घेतली जाते .त्या आधारेच प्रवेश दिले जातात. मात्र महाराष्ट्रत प्रादेशिक आरक्षणाच्या आधारे गुणवत्ता याद्या 70 :30 सूत्रानुसार तयार केल्या जातात. त्यामुळे जास्त गुण असूनही मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात. मराठवाड्यात शासकीय व खाजगी वैद्यकीय 6 महाविद्यालये असून फक्त 900 जागा आहेत .विदर्भात शासकीय व खाजगी अशी एकूण 9 महाविद्यालये असून 1450 जागा आहेत तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय व खाजगी अशी एकूण 26 वैद्यकीय महाविद्यालये असून 3950 जागा आहेत .येथेही प्रादेशिक असमतोल आहे. पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण नीट परीक्षेत मिळवूनही मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळत नाही. हा अन्याय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून 70 :30 चे सुत्र रद्द करून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश द्यावेत अशी मागणी व स्पष्ट मत ॲड भोसले यांनी व्यक्त केले आहे..

Post a Comment

0 Comments