रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...
रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम
रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका
उस्मानाबाद : कोव्हीड -१९ च्या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्णाकडून मनमानेल तशी रक्कम उकळणाऱ्या डॉ.दिग्गज दापके यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी हॉस्पिटलला १० हजार रुपये दंड करण्यात आला असून, रुग्णाकडून उकळण्यात आलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे तसेच यापुढे सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास प्रतिबंध/ मनाई करण्यात आली आहे.
हे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने चव्हाट्यावर आणले होते.
अँटिजेनच्या नावाखाली रुग्णांची लूट
कोरोना सारख्या महामारीच्या काळात सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलकडून रुग्णाची लूट केली जात होती. रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी शासन नियमानुसार ६०० रुपये रक्कम घेण्यास सांगण्यात आले होते, तरी देखील सह्याद्री हॉस्पीटलकडून दोन हजार रुपये शुल्क आकारले जात होते. याप्रकरणी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असता, जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने दखल घेवून हॉस्पिटल प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती , चोवीस तासात याचा खुलासा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला होता.त्यानंतर हॉस्पीटलकडून समाधानकारक खुलासा करण्यात न आल्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
➤ सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला यापुढे रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास प्रतिबंध/ मनाई करण्यात आली आहे.
➤ रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी ज्या ८२ रुग्णाकडून अधिक रक्कम घेण्यात आली, त्या रुग्णाच्या बँक खात्यावर आठ दिवसाच्या रक्कम अदा करावी. ( ९९,२२० )
➤ शासन निर्णयातील तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी १० हजार रुपये दंड
➤ या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई
COMMENTS