उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांना पाच हजार दंड

मॅटच्या सुनावणी प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे दणका 


उस्मानाबाद - नियमबाह्य बदली प्रकरणात सुनावणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे  पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन व तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिप्परसे यांना मॅटच्या आैरंगाबाद खंडपीठाने प्रत्येकी ५ हजार रुपये दंड केला आहे.

 तुळजापूरचे पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे आणि उमरग्याचे पोलिस निरीक्षक सुरेश चाटे यांची नियमबाह्य बदल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. पोलिस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम सेक्शन २२ नुसार सेवेेत न ठेवता याचिकाकर्ते ठोंबरे यांची ५ महिन्यात तर चाटे यांची ८ महिन्यात बदली करण्याचे आदेश काढण्यात आले होते.

काय आहे प्रकरण ? 

 नियम पायदळी तुडवत अगोदर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, इतकेच नव्हे तर न्यायालयाने विचारणा केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी शपथपत्र दाखल करताना चक्क खोटी माहिती न्यायालयात सादर केली. हा प्रकार महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या (मॅट) निदर्शनास आणून देण्यात आला असता, पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आणि पोलिस उपअधीक्षक (उस्मानाबाद) डी. डी. टिपरसे यांना ३ सप्टेंबर २०२० रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायाधीकरणाचे अध्यक्ष बी. पी. पाटील दिले होते पण  दोघेही या तारखेस गैरहजर राहिले त्यानंतर १५ सप्टेंबर तारीख देण्यात आली होती, त्याही तारखेस दोघे गैरहजर राहिले, त्यामुळे प्रत्येकी पाच हजार दंड  करण्यात आला. 

 याबाबत याचिकाकर्त्याचे वकील ॲड. सुजीत जोशी यांनी सांगितले की, याचिकाकर्त्या पोलिस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम सेक्शन २२ नुसार पोलिस निरीक्षकांना कमीतकमी एका पोलिस ठाण्यात सेवेत ठेवता येते, मात्र याचिकाकर्ते ठोंबरे यांची ५ महिन्यात तर चाटे यांची ८ महिन्यात बदली करण्याचे आदेश काढले. या बदली आदेशाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आले. 

ॲड. जोशी यांनी सांगितले की, याचिकाकर्त्यांना कार्यमुक्त केल्याने मॅटने स्थगिती दिली नाही, तसेच गृहविभागाचे (मंत्रालय) सचिव, पोलिस महासंचालक (मुंबई), विशेष पोलिस महानिरीक्षक (औरंगबाद) आणि पोलिस अधीक्षक (उस्मानाबाद) यांना नोटीसा बजावत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी पोलिस महासंचालक, उस्मानाबाद शपथपत्र दाखल केले की, बदलीसंदर्भातील पोलिस आस्थापना मंडळाची १ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत बैठक झाल्यानंतर बदली आदेश काढल्याचे सादर करत या बैठकीला एस.पी, अतिरिक्त एस. पी हजर होते असे म्हणणे मांडले. परंतू सदर बैठकच झाली नसल्याचे निदर्शनास आणून देत बैठकीच्या दिवशी त्याच वेळेत पोलिस वेल्फेअरचा कार्यक्रम होता, तसेच बैठकीशिवाय करण्यात आलेली बदली नियमबाह्य असल्याचा युक्तीवाद ॲड. जोशी यांनी केला. 

ॲड. जोशी म्हणाले की, त्या कालावधीत म्हणजेच २६ ऑक्टोंबर २०१९ ते ५ नोव्हेंबर २०१९ दरम्यान रजेवर होते. याचिकाकर्त्याच्या युक्तीवादानंतर पोलिस विभागाने म्हणणे मांडले की, अतिरिक्त एस.पी. यांच्याऐवजी पोलिस उपअधीक्षक डी. डी. टिपरसे हे हजर होते, तसेच बैठकीचा कोटा (कोरम) पूर्ण झाल्याने बैठक घेण्यात आल्याचे म्हणणे सादर केले. याचिकाकर्त्यातर्फे युक्तीवाद करण्यात आला की, बैठकीच्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबर २०१९ रोजी सव्वा तीन वाजता श्री. टिपरसे हे नळदूर्ग (जि. उस्मानाद) या घरफोडी झाल्याच्या ठिकाणी गेले होते. तसेच साप्ताहिक डायरीमध्ये सदर बैठकीचा उल्लेखही करण्यात आला नसल्याचे ॲड. जोशी यांनी मॅटच्या निदर्शनास आणून दिले, सुनावणीअंती मॅटने पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आणि डी. डी. टिपरसे यांना ३ सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर  तारीख पडली होती. दोन्ही तारखेस एस. पी. आणि डीवायएसपी गैरहजर होते. 

पोलीस निरीक्षक ठोंबरे आणि चाटे निलंबित 

तुळजापूर आणि उमरगा येथून उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात बदली केल्यानंतर गेले वर्षभर मेडिकल रजेवर असणाऱ्या दोन पोलीस निरीक्षकांना विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोली (  औरंगाबाद परिक्षेत्र ) यांनी निलंबित केले आहे.

 एस.आर.ठोंबरे आणि  सुरेश चाटे अशी या पोलीस निरीक्षकांची नावे  आहेत. १ नोहेंबर २०१९ रोजी  एस.आर.ठोंबरे यांची  तुळजापूर येथून आणि सुरेश चाटे यांची उमरगा येथून उस्मानाबाद  पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती, त्यानंतर हे दोघे मुख्यालयात रुजू होऊन लगेच वैद्यकीय रजेवर गेले होते. दोन वर्षाच्या आत बदली केली म्हणून उभयतांनी  मॅट मध्ये धाव घेतली असताना, त्यांच्या निलंबनाचा आदेश निघाल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करता रजेवर जाणे, कोव्हीड सारख्या महामारीच्या काळात कामावर हजर न  होणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश न पाळणे असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. राजपत्रित अश्या जबाबदार पदावर असताना, बेशिस्त, बेजबाबदार वर्तन केल्यामुळे आपणस निलंबित करण्यात येत आहे, निलंबन काळात उस्मानाबाद पोलीस मुख्यालयात दैनंदिन हजेरी लावावी, असे एस.आर.ठोंबरे आणि  सुरेश चाटे यांच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments