४ दिवसांत ४ मंत्र्यांसह २० नेत्यांची पाहणी, हाती काही नाही उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्र सेल्फी पाईंट म्हणून घोषित करा उस्...
४ दिवसांत ४ मंत्र्यांसह २० नेत्यांची पाहणी, हाती काही नाही
उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित क्षेत्र सेल्फी पाईंट म्हणून घोषित करा
उस्मानाबाद - कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात चालू ऑक्टोबर महिन्यात धो - धो पाऊस पडला. गेल्या २५ वर्षात झाला नाही इतका पाऊस पडला. त्यामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीन वाहून गेले. अनेकांचे शेतीचे बांध फुटून माती वाहून गेली. जमीन खरडून निघाली. विहिरी बुजल्या. होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
अतिवृष्टी बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. संभाजीराजे भोसले, राज्यमंत्री संजय बनसोडे, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार आदी नेत्यांनी विविध गावांना भेटी दिल्या तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार यांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. या सर्व नेत्यांनी दौऱ्यावर लाखो रुपयांचा खर्च केला, परंतु शेतकऱ्यांना कुणीही ठाम आश्वासन दिलेले नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने पाहात असताना कुणीच कसलीही मदत केलेली नाही.
कोरड्या किंवा ओल्या दुष्काळाने पिचलेल्या जिल्ह्याला यावेळीही निसर्गाने गाठले आहे. गेल्या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. अशावेळी मायबाप शासन काहीतरी मदत देईल, अशी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या नशिबी मात्र इथेही निराशाच आहे. दुष्टचक्र सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरडोई उत्पन्न अत्यंत कमी असलेल्या देशातील ११५ जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. शेती हेच मुख्य साधन आहे. त्यातही निसर्गाकडून छळ होतोय. अशा परिस्थितीत सगळ्याच प्रमुख राजकीय पक्षाचे नेते टोलवाटोलवी करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे भांडवल करणार असतील तर शेतकऱ्यांना दिलासा कोण देणार? जिल्ह्यावर कोपलेल्या निसर्गामुळे शेतकरी हताश आहे, त्याला सगळ्यांकडून मदतीची आस आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वजनदार राजकीय नेते, मंत्री, आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे चार दिवसांपासून पाहणी दौरे सुरू आहेत. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे नेते पाहणीसाठी जात आहेत. सगळेच राजकीय नेते एकमेकांवर टीका करत सुटले आहेत. अजूनतरी शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा झाली नाही, त्यामुळे ओल्या दुष्काळाच्या पाहणीचा दौरा फार्स ठरू नये, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
त्यामुळे मनसेने एक अजब होर्डिंग्ज तयार केले असून, उस्मानाबाद जिल्हा व्हीआयपी सेल्फी पाईंट म्हणून घोषित करा, अशी मागणी केली आहे. मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी उस्मानाबाद मधील मुख्य चौकात हे होर्डिंग्ज लावले आहे
उस्मानाबाद शहरात मनसेचे अजब होर्डिंग्स उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टिग्रस्त भाग सेल्फी पाईंट म्हणून जाहीर करा ... उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात नेत्यांच्या दौऱ्यांचा महापूर https://www.osmanabadtoday.com/2020/10/Osmanabad-Heavyrain-MNS--Selfie-point.html
Posted by Osmanabad Live on Tuesday, October 20, 2020
COMMENTS