परंडा : उंडेगावमधील घराला भीषण आग , सहा लाखांचा ऐवज जळून खाकपरंडा - उंडेगाव (ता. परांडा) येथील श्री. नंदकुमार कुलकर्णी यांच्या घराला शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) रात्री अचानक आग लागून माळवदाचे चार खण जळून खाक झाले. त्यांच्या किराणा दुकानातील काही साहित्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे जवळपास पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले.


याबाबत अधिक माहिती अशी की, यंदा परतीच्या पावसामुळे खंडेश्वरवाडी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तथापि, धरणाच्या भरावास उभ्या भेगा पडल्याने सांडवा व कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या उंडेगावमधील नागरिकांना शेजारच्या गावांत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  दरम्यान, शनिवारी रात्री उंडेगावचे रहिवासी असणार्‍या नंदकुमार कुलकर्णी यांच्या घराला अचानक आग लागली. श्री. कुलकर्णी हे शेतकरी असून घराच्या बाहेरील बाजूस त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास गावातून अचानक धूर येऊ लागल्याचे लक्षात येताच स्थलांतरित झालेल्या उंडेगावच्या रहिवाशांनी गावाकडे धाव घेतली. जवळपास 100 लोकांनी गावातील घरांमधून बादल्या, घागरी घेऊन पाण्याचा मारा करत ही आग विझवण्यात यश मिळवले. या आगीत श्री. कुलकर्णी यांच्या घरातील चार खण धान्य, किराणा माल आणि अन्य वस्तू-साहित्य असा सुमारे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.


रविवारी तलाठी मोनिका मसुदगे आणि नायब तहसिलदार पांडुरंग इनामदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आढावा घेतला असून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सुपूर्द केला आहे. आगीमुळे श्री. कुलकर्णी यांना मोठा आर्थिक फटका बसला असून लवकरात लवकर प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सखुताई पवार आणि श्री. रमेश पवार यांनीही घटनास्थळाची पाहणी करुन नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.


उंडेगावमधील रहिवासी सध्या दिवसभर रानात काम करुन रात्री गावाबाहेर वास्तव्य करत आहेत. आपली घरे तशीच सोडून गेल्याने चोर्‍यांची भीती मनात असताना आता आगीच्या घटनेनेमुळे उंडेगावमधील नागरिकांत धास्तीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments