तुळजापूर - तुळजापूर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अखेर अहमदनगरला बदली झाली आहे. गवळी यांच्या जागी आता कोणाची ...
तुळजापूर - तुळजापूर पोलीस स्टेशनचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अखेर अहमदनगरला बदली झाली आहे. गवळी यांच्या जागी आता कोणाची नेमणूक होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
तुळजापूरचे पोलीस निरीक्षक साईनाथ उर्फ एस.आर.ठोंबरे यांची १ नोहेंबर २०१९ रोजी मुदतपूर्व बदली करून हर्षवर्धन गवळी यांची नियुक्ती करण्यात आली होती. बीड जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गवळीवर एका सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असताना तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्र ठिकाणी नियुक्ती देण्यात आली होती.
गवळी यांच्या काळात तुळजापुरात अवैध धंदे फोफावले होते. गवळी यांच्याविरुद्ध सतत आवाज उठवणारे समाजसेवक राजाभाऊ माने यांच्याविरुद्ध त्यांनी खोट्या कारवाया केल्या होत्या. तसेच त्यांचा मुलगा अभिषेक माने याच्याविरुद्ध एमपीडीएची खोटी कारवाई केली होती. बनावट रेकॉर्ड तयार करून अहवाल तयार केल्याने अभिषेक मानेविरुद्धचा स्थानबद्धतेचा आदेश राज्याच्या गृहविभागाने रद्द केला होता. याप्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक ( औरंगाबाद परिक्षेत्र ) यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक, तुळजापूर आणि पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची खातेनिहाय चौकशी सुरु आहे.
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची बदली करावी, अशी मागणी करणारे अनेक निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठवण्यात आले होते. देशमुख यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत बदलीच्या नव्या यादीत गवळी यांचा नंबर लागला आहे.
तुळजापूर मंदिर समिती घोटाळ्यातील आरोपी दिलीप नाईकवाडी यास अभय देणे, अणदूर गांजा प्रकरणातील आरोपी मीना पाटील हिला अटक न करणे, अनेक प्रकरणात तोडपाणी करणे आदी कारणामुळे गवळी यांची उचलबांगडी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
COMMENTS