१४ वा वित्त आयोग व दलित वस्ती कामात अनियमितता उस्मानाबाद - तालुक्यातील बेंबळी येथील करण्यात आलेल्या विकास कामात १४ व्या वित्त आयोग व दलित ...
१४ वा वित्त आयोग व दलित वस्ती कामात अनियमितता
उस्मानाबाद - तालुक्यातील बेंबळी येथील करण्यात आलेल्या विकास कामात १४ व्या वित्त आयोग व दलित वस्ती सुधार योजनेच्या कामामध्ये १२ लाख रुपयांची अनियमितता केली असून कामे न करताच ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांनी बोगस अहवाल सादर करून शासनाच्या निधीत भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दि. १७ फेब्रुवारी २०२० रोजी केलेल्या तक्रारी अर्जावर विस्तार अधिकाऱ्यांनी चौकशी करून तो अहवाल आपल्या कार्यालयाकडे सादर केलेला आहे. त्यावर अवलोकन केले असता दि.८ मे २०२० रोजी सिलिकॉन इंटरप्राईजेसच्या नावे विद्युतीकरणाच्या ६ कामावर प्रत्येकी २ लाख याप्रमाणे १२ लाख रुपये कोणत्या नियमाने दिले ? याचा बोध होत नाही, असे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
तसेच प्रत्यक्षात शिवाजी चौक, बाजार चौक व अक्सा चौक येथे प्रत्येकी एक याप्रमाणे ३ हामयस्ट बसविले आहेत. तर उर्वरित ३ विद्युतीकरणाची कामे न करता ते कामे केल्याचे बनावट अभिलेखे जिल्हा परिषदेच्या उप अभियंता यांत्रिकी यांच्या संगनमताने त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासून सरपंच व ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय बेंबळी यांनी शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विद्युतीकरणाच्या ६ कामांचे तात्काळ आपण स्वतः स्थळ पाहणी करून जिओ टॅगिंग फोटोसह निवेदक यांच्या समक्ष पंचनामा करावा व विनाविलंब याची सर्वस्वी जबाबदारी व्यक्तीश: आपणावर राहील याची गांभीर्यपुर्वक नोंद घ्यावी असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
COMMENTS