शाळेची घंटा वाजण्याअगोदर धोक्याची घंटा वाजली उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या सोमवारपासून शाळा ( ९ वी ते १२ वी वर्ग ) सुरु होणार आ...
शाळेची घंटा वाजण्याअगोदर धोक्याची घंटा वाजली
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात उद्या सोमवारपासून शाळा ( ९ वी ते १२ वी वर्ग ) सुरु होणार आहे. पण त्याअगोदर धोक्याची घंटा वाजली आहे. जिल्ह्यातील ५५ शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत. त्यामुळे शाळा सुरु होणार असली तरी आपल्या मुलाला शाळेत पाठवावे की नाही, अश्या संभ्रमावस्थेत पालक सापडले आहेत.
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील शाळा बंदच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. कोरेानाच्या लॉकडाऊननंतर हळहळू अनलॉक होत गेल्यानंतर आता २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊनच शाळा सुरू करण्याबद्दलचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातही ९ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सोमवारी सुरू होत आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, संबंधित वर्गांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरेाना तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील ४९१ शाळांमध्ये ९ वी ते १२ वीचे वर्ग असून, या शाळेसाठी ४ हजार ७३७ शिक्षकांची आवश्यकता आहे. या सर्व शिक्षकांची कोरेाना तपासणी करण्यात आली. शुक्रवारपर्यंत ५२ शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. शनिवारी त्यात ३ जणांची भर पडली. आता एकूण ५५ शिक्षकांचे कोरेाना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ४१६० जण निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक २५ शिक्षक व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. उस्मानाबादच्या भोसले हायस्कुलमधील जवळपास २० शिक्षक कोरोना पॉजिटीव्ह निघाले आहेत.
पालकावर सक्ती नाही - जिल्हाधिकारी
उद्या सोमवारपासून शाळा सुरु करण्यात आल्या तरी पालकांवर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती करु नये. गर्दी न होऊ देता समुपदेशन आयोजित करुन घरी कोणता अभ्यासक्रम स्वयंअध्ययनाने पूर्ण करता येऊ शकतो याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी विषयनिहाय स्वयंअध्ययन शक्य असलेला अभ्यासक्रमातील भाग याची सूची बनवून इयत्ता व विषयनिहाय पालकांना देता येईल असा प्रयत्न करावा.नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून मास्कचा वापर न केल्याने व सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंन्सींग) पालन न केल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कोविड-19 बाबत शासन निर्देशांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले आहे.
ज्या संस्थांना आपल्या निवासी शाळा सुरु करावयाच्या आहेत त्यांनी अनिवासी शाळेप्रमाणे केवळ वर्ग भरवावेत. हॉस्टेल व इतर राहण्याच्या सुविधा सुरु करता येणार नाहीत. अशा परिस्थितीत पुढील सूचना येईपर्यंत ऑनलाईन सुविधा पुरविणे उचित राहील, असेही निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर दिले आहेत.
COMMENTS