अभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...
अभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी
उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अड्डा झाला आहे. अभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या बोस नोंदी करून सरकारी अनुदान लाटले जात असून, यात सरकारी कामगार अधिकारी आणि कर्मचारी गुंतले आहेत. त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
उस्मानाबादच्या सरकारी कामगार अधिकारी कार्यालयात दलालांचा सुळसुळाट सुरू आहे. कामगार कार्यालयात दररोज कर्मचारी कमी, दलालांचा अधिक राबता आहे. कामगारांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ बोगस कामगारांना देऊन स्वत: अर्धी रक्कम उकळण्याचे प्रकार घडत आहेत. दलाल आणि अधिकारी यांच्या संगनमताने सरकारी अनुदानावर दरोडा टाकला जात असताना, वरिष्ठ अधिकारी गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहेत.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांना या योजनांच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक सवलती देण्यात येतात. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालयाच्या वतीने बोगस बांधकाम मजुरांची नोंदणी करून करोडो रुपयांच्या निधीवर पारदर्शक दरोडा टाकण्यात आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजअखेर ६० हजाराच्या जवळपास नोंदणीकृत बांधकाम मजुरांची संख्या आहे. यापैकी गावोगावचे ८० टक्के बांधकाम मजूर बोगस असून ते बांधकाम व्यवसायाशी संबंधित नाहीत. ही बाब एकमतने अनेक गावात केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाली आहे. बोगस लाभार्थीच्या नावावर जमा झालेली अर्धी (५० टक्के) रक्कम दलालामार्फत माघारी घेऊन मोठा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.
उस्मानाबादेतील एका बांधकाम अभियंत्याच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून, तसेच बोगस स्वाक्षरी करून दलालांच्या टोळीने कामगारांच्या नावावर रक्कम उचलल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ‘आमच्या बातमीदाराने कामगार कार्यालयातील काही कामगारांच्या नोंदणी प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर चक्क ठेकेदारांच्या, अभियंत्यांच्या बोगस शिक्क्यांचा वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
याबाबत कामगार कार्यालयाचे अधिकारी मात्र कानावर हात ठेवत आहेत. बोगस शिक्के, सह्यांचा वापर करून कामगारांच्या नोंदी करणाऱ्या दलालांच्या टोळीने अनेक कामगारांकडून अर्धी रक्कम उचलल्याची बाब समोर आली आहे. बांधकाम मजुरांसाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र, या योजना खऱ्या कामगारांना मिळतच नाहीत. मात्र, बोगस कामगारांना शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे कामगार चांगल्या पदावर किंवा उच्चभ्रू आहेत. त्यांच्या नोंदी करून त्यात दलालांची टोळी अर्ध्या रकमेत वाटेकरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कामगार कार्यालयातून लाभ घेतलेल्यांची चौकशी करावी,दलालांच्या कागदपत्रांची पडताळणी करून बोगस शिक्क्यांसह सह्यांचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
केवळ अभियंत्यांचेच नव्हे तर ठेकेदारांचेही बनावट शिक्के वापरले गेल्याचे उघड आले. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील एका बांधकाम ठेकेदाराच्या शिक्क्याचा वापर वाशी तालुक्यातील इंदापूर येथील कामगारांच्या प्रमाणपत्रासाठी केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे संबंधित ठेकेदारालाही हा प्रकार ज्ञात नव्हता. अशाच प्रकारे ग्रामसेवकांच्या शिक्क्यांचा वापर झाला असल्याचे बोलले जात आहे. काही दलालांची टोळी स्वत:कडे अशा प्रकारचे बनावट शिक्के बाळगत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात आपल्याकडे तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई करू, असे कामगार अधिकारी अजय काशिद यांनी सांगितले.
अभियंतेच अनभिज्ञ
आपल्या सही, शिक्क्यांचा वापर होत असल्याबद्दल बांधकाम अभियंते अनभिज्ञ असून, काही अभियंत्यांच्या बाबतीत हे प्रकार समोर आल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. काही ठेकेदारांच्याही शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आल्याने कार्यालयातल्या किती नोंदी बोगस शिक्क्याने करण्यात आल्या आहेत, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणात एका पक्षाचा पदाधिकारी आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी गुंतले असून, त्याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
Khup lutmar karat ahet he dalal
ReplyDelete