दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...
दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला
कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती कोण आहे आणि कोणी खून केला शोधणे, पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
कोंबडवाडी येथील आश्रुबा राजेंद्र मिसाळ यांची शेती आहे. मिसाळ हे शुक्रवारी पहाटे ५ वाजता विहिरीवरील मोटार चालु करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे त्यांना आढळून आले. सदरील मृत इसमाचे दोन्ही पाय नायलन पट्टीच्या दोरीने बांधण्यात आले होते तर त्याच्या कमरेला दगड बांधण्यात आला होता. याची माहिती ढोकी पोलिस ठाण्याला देण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. एस. बुद्धिवार यांनी आपले सहकारी गजेंद्र गुंजकर व उपेंद्र कुलकर्णी यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर विहीरीमधील मृतदेह बाहेर काढून रितसर पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी ढोकी येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला.
तत्पुर्वी उस्मानाबाद येथुन श्वानपथकही तपासासाठी मागविण्यात आले होते. यावेळी घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकार शिवशंकर काशिद, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे, पोलिस उपनिरिक्षक पी.व्ही. माने यांनीही भेट दिली. पोलिसांच्या अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वी सदरील इसमाचा खून करुन मृतदेह विहिरीमध्ये टाकण्यात आल्याचे समजते. याबाबात रात्री उशिरापर्यंत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती.
रात्री उशिरापर्यंत मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली असून आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.यावरुन ढोकी पो.ठा. चे गजेंद्र गुंजकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS