उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील ये...
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्या आणि दरोड्याच्या घटनेत वाढ झाली आहे. सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळ्याजवळील नाथवाडी पाटीलगत ६ अनोळखी दरोडेखोरांनी पंढरपूरच्या व्यापारी असलेल्या लाड कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखवून, मारहाण करून ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. सोमवारी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणी येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सशस्त्र दरोड्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पंढरपूर येथील भालचंद्र गोविंदराव लाड, सुषमा भालचंद्र लाड, सुनील सुरेश लाड, सायली सुनील लाड, चालक संभाजी पवार (रा.पंढरपूर), हे सर्वजण स्वतःच्या कारने (एमएच १३ सीएस ७३०८) लग्न कार्यासाठी शुक्रवारी (दि.२५) अकोला येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सोमवारी (दि.२८) दुपारी ४ वाजता परत निघाले. रात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास पंढरपूरकडे येडशी मार्गाने जात असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर येरमाळ्याजवळील धाराशिव साखर कारखान्याजवळ नाथवाडी पाटीदरम्यान कारवर दरोडा पडला. त्यांच्या गाडीला रोडवर पडलेल्या तुटलेल्या जॅकचा फटका बसला. हा फटका कार चालकाच्या सीटच्या बाजूला बसलेले डॉ. सुनील लाड यांच्या पायाला लागला. त्यामुळे गाडी व्हायबल झाली.
ड्रायव्हरने गाडी साइडला घेऊन, खाली उतरून गाडीची पाहणी केली. यावेळी डॉ. सुनिल लाड पायाला लागल्याने खाली उतरून पाहणी करताना रोडच्या साइडपट्टीच्या खड्ड्यातून पहिल्यांदा चार अनोळखी लोक आले व काय झाले काका,अशी विचारणा केली. लाड कुटुंबीयांना त्यांचा संशय आल्याने ते पटकन गाडीत बसत असताना गाडीतील भालचंद्र लाड यांना एकाने कॉलरला धरून बाजूला खड्ड्यात ओढत नेले. सोबत असलेल्या महिलांना चाकूसारख्या हत्याराने धाक दाखवून त्यांच्याकडील दागिणे, मोबाइल, पैसे काढून द्या म्हणून मारहाण करुन हिरेजडीत सोन्याची अंगठी ७ नग, ३१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र दोन, सोन्याचे गंठण ३१ ग्रॅम व १० ग्रॅम, असे एकुण ४१ ग्रॅम, सोन्याचे गळ्यातील हार, दोन राणी हार, सोन्याची साखळी, एक सोन्याचे चैन १३ ग्रॅम, सोन्याची कर्णफूले एक, १० ग्रॅम वजनाचे कानातले, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सामान मोबाइल फोन असा एकूण ७ लाख, १२ हजार १०० रुपये किंमतीचा एेवज अनोळखी सहा चोरट्यांनी चोरून नेला आहे.
मंगळवारी निखील विजय लाड (पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे करत आहेत.कळंब-येरमाळा मार्गाचे काम अर्धवट असल्याने या मार्गावर ठिकठिकाणी लूटमार होत असतानाच आता धुळे-सोलापूर या सतत वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरही दरोड्याच्या घटना घडत असल्याने वाहन चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
COMMENTS