उस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...
उस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल्हयात 28 डिसेंबर 2020 पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. 28 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान राबवयाच्या या उपक्रमाचा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज विभागीय आयुक्तालयातील उपआयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा यांच्या उपस्थित कार्यशाळा घेऊन प्रारंभ करण्यात आला.
हा उपक्रम अभियान स्वरूपात राबविण्यात येणार आहे.यासाठी यामध्ये कार्यालयीन स्वच्छता आणि अनुषंगीक बाबी,प्रशासकीय बाबी आणि कार्यालयाच्या वैयक्तीक बाबींचा समावेश आहे, असे सांगून श्री.बेदमुथा यांनी या अभियानातंर्गत केलेल्या पंचायत सामिती निहाय कामांचे मूल्याकन करून आपल्या जिल्हयातील प्रथम, व्दितीय आणि तृतीय या क्रमांकानुसार आणि जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा सविस्तर अहवाल जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या शिफारशीसह विभागीय आयुक्त कार्यालयात पाठवावयाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत राज व्यवस्था ही लोकशाहीची कार्यशाळा आहे. या ठिकाणी कार्यरत असणारे अनेक पदाधिकारी हे सरपंच पदापासून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पदापर्यंत कार्यरत असल्याचे दिसून येते, असे सांगून श्री.बेदमुथा म्हणाले की, जिल्हयात कार्यरत असलेल्या एकूण अधिकारी कर्मचाऱ्यापैकी 70 टक्के कर्मचारी पंचायत राज व्यवस्थीत कार्यरत असतात. या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिवसभरातील एक तृतीअंश वेळ कार्यालयातील सुधारण्यासाठी म्हणजे आपले कार्यालय सुंदर करण्यासाठी द्यावा.त्यामुळे कार्यालयातील वातावरण बदलण्यास मदत होवून त्यांचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत बदल होण्यास म्हणजे उत्साहावर्धक वातावरण निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला .
या अभियानांतर्गत, कार्यालयीन अंतर्गत आणि बाह्य परिसराची स्वच्छता, प्रशासकिय कामकाजामध्ये गतिमानता, तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींसाठीची पुर्तता वेळेत करणे या व इतर महत्वाच्या बाबींचा अभियानामध्ये समावेश आहे. हे अभियान जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तर व तालुकास्तरावरील सर्व कार्यालये या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालयीन आंतर-बाह्य परिसराची स्वच्छता, आकर्षक रचना, रंगरंगोटी, जुन्या साहित्याचे निर्लेखन, कार्यालयीन शौचालये यांची स्वच्छता व वापर, कचरा विल्ह्यवाट, सुंदर कुंड्यांची रचना, कर्मचाऱ्यांच्या आस्थापनेवर कार्यासनाचे बोर्ड लावणे, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणे, कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा वापर करणे, इमारतींच्या भिंतीवर सुविचार लावणे, इमारतींवर रेन हार्वेस्टींग सिस्टीम बसविणे, तसेच सोलार यंत्रांचा वापर करणे, इत्यादी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामकाजास गतिमानता प्राप्त होण्यासाठी विशे्ष प्रयत्न केले जाणार आहेत. कार्यालयीन कामकाजामध्ये सहास्तरीय गठ्ठे पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनीही अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपले कार्यालय आणि त्याचा परिसर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका केला तर त्यांचा तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेत सकारत्मक बदल होण्यास मदत तर होईलच त्याच बरोबर नागरिकांनाही अशा कार्यालयात आल्यानंतर आनंद वाटेल तथापि कर्मचाऱ्यानी हे काम करताना नागरिकाच्या कामानाही प्राधान्य द्यावे. कामात कुचराई करू नये, काम न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची मी योग्य वेळी योग्य प्रकारे नोंद ठेवत असतो तेव्हा प्रत्येकाने दिलेली कामे वेळेत करण्यावर भर द्याव्या, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. फड यांनी आपण सर्वजन हे शासनाचे लोकसेवक म्हणून कार्यरत असून सामान्य लोकांना चांगल्याप्रतीची सेवा देण्यासाठी बांधील आहोत. आपल्या कार्यालयीन कामकाजाप्रती आपली चांगली निष्ठा व सकारात्मक दृष्टीकोन असला पाहिजे. या अभियानासाठी सर्वांनी उदधीष्टाप्रमाणे आपापल्या अंतर्मनाचे सौंदर्य वाढविले पाहिजे. आपण सुंदर काम करणार आहोत, आपण ज्याठिकाणी काम करतोत ते कार्यालय सुंदर असले पाहिजे. यासाठी सर्वांनी स्वत:च्या निष्टेने काम केले पाहिजे. आणि होणार नसेल तर वेळ पडल्यास सक्ती पण करावी लागेल. जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कामकाजामध्ये अपेक्षेप्रमाणे बराच फरक पडलेला आहे. कार्यालयीन संचिकेमधील टिप्पणी काम सुंदररित्या पार पाडले जात आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहणे, तुज आहे तुजपासी, तू जागा भूललाशी या उक्तीप्रमाणे सर्वांजवळ कामाची प्रेरणा आहे. पण सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगून काम करणे आवश्यक आहे. कार्यालयीन कामकाजाचे आपल्याला समाधान मिळाले पाहिजे,असेही त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेनंतर जि.प.इमारतीतील स्वच्छता करून अधिकाऱ्यांनी या अभियानाचा प्रारंभ केला. या कार्यशाळेस जिल्हयातील सर्व गटविकास अधिकारी,सर्व विभागप्रमख, बांधकाम आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उप अभियंता, महिला व बालकल्याण विभागाही संबंधित अधिकारी, उपस्थित होते. तर या सभारंभास अप्पर मुख्य कार्यकारी अनिलकुमार नेवाळे, उप मुख्यकार्यकारी अधिकारी सर्वश्री संजय तुबाकले,डॉ.नीतीन दाताळ, आनंद कुंभार,मुख्य लेखा वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे आदी उपस्थित होते.डॉ.तुबाकले यांनी प्रस्ताविक करून कार्यशाळेच्या शेवटी आभार मानले.
COMMENTS