उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ...
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यामधील ग्रामीण भागात शासनमान्य मद्य विक्री परवाने घेऊन नियमाप्रमाणे मद्य विक्री केली जाते. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विना परवाना व अवैधरित्या धाबे, पानटपरी तसेच हॉटेलमध्ये राज्यातील बनावट दारू विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे परवानाधारक विक्रेत्यावर संकट आले असून ती विक्री तत्काळ थांबविण्यात यावी अशी मागणी उस्मानाबाद ग्रामीण तालुका परमिट रूम असोसिएशनच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अवैधरित्या विक्री होत असलेल्या अवैध मद्य विक्री बाबत यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मद्य विक्री बंद करावी अशी मागणी केलेली आहे. परंतु त्याबाबत राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभाग यांच्याकडून नाममात्र कारवाई केली जात आहे. प्रत्यक्षात ढाबा मालक, हॉटेल मालक यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असताना तेथील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारावर कारवाई केली जात आहे.
विशेष म्हणजे उस्मानाबाद तालुक्यात केवळ दोन वाईन शॉप असून उपलब्ध आकडेवारीनुसार दरमहा एका वाईन शॉपमधून १९ हजार ८३ लिटर दारू विक्री होत आहे. या विक्रीद्वारे ३८ रुपये याप्रमाणे ७ लाख २५ हजार ३०८ असे दोन्हीचे मिळून १ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा महसूल शासनास मिळणे अपेक्षित आहे. परंतू वाईन शॉपवाले त्यापैकी १९ हजार ८३ लिटर पैकी १० हजार लिटर दारु ही ढाबा मालक, हॉटेल मालक व इतर किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतात. तसेच ते बनावट दारू विक्री करीत असल्यामुळे शासनाचा महसूल बुडवून प्रचंड नुकसान होत असून हॉटेल व धाबे हे २४ तास उघडे असतात. त्यामुळे आम्हा परवानाधारक विक्रेत्यांचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे संबंधित अवैध दारू विक्री करणार्यांवर ठोस कारवाई केल्यास शासनाचा महसूल देखील वाढणार आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करून उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातील होत असलेली अवैध व विना परवाना मद्य विक्री करणाऱ्यांवर कडक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चंद्रकांत आवटे, सचिव दिवाकर चंद्रकांत भट व तानाजी माळी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
COMMENTS