उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी असा शिवद्रोही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो नि...
उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी असा शिवद्रोही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करताना मिरवणूक न काढणे, जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेणे अशा जाचक अटीचे निर्णय घेतल्यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आपल्या आवाहनास जनतेने मनापासून प्रतिसाद दिला. परंतू २०२१ साल हे जगातील लोकांसाठी आशादायी किरणाने उजळले आहे. नव्हे तर कोरोना सारख्या जागतिक महामारीला हरवू शकतो असा आत्मविश्वास देणारे ठरले आहे.
कोरोना सोबतच अतिवृष्टीच्या संकटाचा देखील सामना केला. या संकटकाळात आपल्या उत्कृष्ट दिलासादायक संवादाने व काळजीवाहू नेतृत्व गुणाने आपण जनतेच्या मनातील अवडते मुख्यमंत्री देखील ठरलात. परंतू नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अटी नियम घालून परवानगी दिली. त्याद्वारे राज्याला महसूल देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. तर सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व व्यवहार, व्यापार, लग्न, धार्मिक कार्य, मंत्र्यांचे दौरे, राजकीय सभा अगदी मुक्तपणे सुरळीत सुरू केले आहेत. तसेच राज्यातील मंत्री, नेते, मोठमोठ्या सभा घेत आपले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडीत आहेत. विशेष म्हणजे गावोगाव धर्माच्या, देवाच्या नावाखाली कीर्तने हरिनाम सप्ताह साजरा करण्याची परवानगी दिली जात आहे. त्यावेळी आपल्याला कोरोनाच्या प्रसाराची भीती वाटत नाही, जनतेची काळजी वाटत नाही. परंतू नेमकी महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवरायांच्या जयंतीच्या उत्सवातच कोरोनाच्या प्रसाराची आपल्याला भीती वाटते हे अनाकलनीय आहे. म्हणूनच आपला हाच शिवजयंती बाबतचा निर्णय आम्हा शिवप्रेमींना औरंगजेबी फतव्यापेक्षा वेगळा वाटत नाही. त्यामुळेच हा निर्णय म्हणजे शिवद्रोह आहे.
शिवजयंतीच्या निमित्ताने नागरिकांना आपण एका मोठ्या जीवघेण्या महामारीतून सुखरूप बाहेर पडल्याचा आनंद साजरा करता येणार आहे, मुक्तपणे एकत्र येता येणार आहे, जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या मेजवान्याचा लाभ घेता येणार आहे, माणसा-माणसात निर्माण झालेला दुरावा कमी करता येणार आहे. असे असताना आपण जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत वेदनादायी असून आपल्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. आपण अत्यंत मर्यादित जनसमूहात शिवजयंती साजरी करण्याबाबत घेतलेला शिवद्रोही निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिवप्रेमी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेडच्या स्टाइलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, जिल्हा सचिव आशिष पाटील, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कवडे, माजी जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संदीप लाकाळ, जिल्हा उपाध्यक्ष आकाश मुंडे, कळंब तालुकाध्यक्ष बालाजी नाईकनवरे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण, कार्याध्यक्ष रामेश्वर बोबडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष अदित्य देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मनोज लोमटे-पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. आकाश एडके, शिवदास पवार, रईस शेख, प्रशांत शेळके, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS